|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इतिहास रंजकपणे सांगण्याची खरी गरज

इतिहास रंजकपणे सांगण्याची खरी गरज 

प्रतिनिधी/ बेळगाव

आपल्या देशात मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. हिंदू, जैन मंदिरे ही पुरातन असून त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याचे धाडसी कार्य ज्युलिया हेगेवाल्ड यांनी केले आहे. आपल्या देशाचा धर्म, पद्धती माहित नसतानाही अगदी बारीक निरीक्षणे करून त्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी बहुखुबीनं केलं. भविष्यात अशा प्रकारे आपणही करणं आवश्यक असून इतिहास हा अधिक रंजक पद्धतीने सांगण्याची आज खरी गरज असल्याचे मत प्रा. स्वाती जोग यांनी बोलताना व्यक्त केले. रविवारी बुक लव्हर्स क्लबच्या अनगोळ रोडवरील लोकमान्य ग्रंथालयाच्या साने गुरूजी सभागृहात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

हेडेलबर्ग पेपर्समध्ये ज्युलिया हेगेवाल्ड यांनी मंदिरांच्या सखोल निरीक्षणासंदर्भात नोंदी नोंदवल्या असून या विषयावर त्या बोलत होत्या. त्या बोलताना म्हणाल्या, माझ्याकडे 1100 हून अधिक दुर्मिळ इ-पुस्तके आहेत. त्यातील काही पुस्तके सन 1672 व 1499 चीदेखील आहेत. विदेशी लोकांनी आपल्या देशाचा धर्म, पद्धती माहित नसतानाही अगदी बारीक निरीक्षणे नोंदवत कागदोपत्री नोंदी उत्तमपणे ठेवल्या आहेत. आपल्याच येथील धर्मांनी दुसऱया धर्माच्या मंदिरांचा, बस्तींचा ताबा घेतला पण त्यातील शिल्पकला व इतर वैशिष्टय़े तशीच राहिल्यामुळे मूळ मंदिर कोणाचं आहे हे निरीक्षण केल्यानंतर सहजपणे लक्षात येतं. ज्युलिया हेगेवाल्ड व सुब्रत मित्रा यांचं कार्य, बेळगावचा किल्ला, कमलबस्ती, पट्टदकल, सौंदत्ती, तोरगल किल्ला, जैन, हिंदू व  इतर धर्मातील विशिष्ट चिन्हे, बेल्जीयममधील जैन धर्माचा अभ्यास, चर्च, चापेल, कॅथेड्रल अशा विविध विषयांवर सविस्तर सांगत इतिहासासंबंधीचं किंवा इतर आपलं ज्ञान इतरांना जास्तीत जास्त देण्याची वा वाटण्याची वृत्ती वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी ज्येष्ठ सदस्य गोविंदराव फडके यांनी स्मृतीपर्ण व फूल देऊन प्रा. स्वाती जोग यांचे स्वागत केले. किशोर काकडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

 

Related posts: