|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मंत्र्यांना कार्यालयीन दालनांचे वाटप

मंत्र्यांना कार्यालयीन दालनांचे वाटप 

एकनाथ शिंदेंना तिसऱया मजल्यावरचे दालन

भुजबळ दुसऱया तर देसाई पाचव्या मजल्यावर

सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी

मुंबई / प्रतिनिधी

सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी नव्या सरकारमधील मंत्र्यांना मंत्रालयातील कार्यालयीन दालनांचे वाटप केले. मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमधील तिसऱया मजल्यावरील दालनासाठी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच होती. अखेर हे प्रशस्त दालन शिंदे यांना मिळाले आहे. तर भुजबळांच्या वाटय़ाला मुख्य इमारतीत दुसऱया मजल्यावरील दालन आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडीची औपचारिकता पार पडल्यानंतर काल, सोमवारी मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले. आज सामान्य प्रशासन विभागाने ठाकरेंसह सात मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप केले.

गेल्या सरकारच्या कार्यकाळातील माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनासाठी भुजबळ आणि शिंदे दोघेही आग्रही होते. अखेर हे दालन शिंदेंना मिळाले आहे. दालन वितरीत झाल्याचा आदेश निघाल्यानंतर दालनाबाहेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लगेच लावण्यात आली. सुभाष देसाई यांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या खालच्या मजल्यावर 502 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांना विस्तारीत इमारतीत सहाव्या मजल्यावर 607 क्रमांकाचे दालन मिळाले आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 108 क्रमांकाचे तर डॉ. नितीन राऊत यांना मुख्य इमारतीत चौथ्या मजल्यावर 402 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.

Related posts: