|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खड्डय़ांमध्ये सांडपाणी सोडणाऱया कारखान्यांची ‘पोलखोल’

खड्डय़ांमध्ये सांडपाणी सोडणाऱया कारखान्यांची ‘पोलखोल’ 

चिपळुणातील विविध संघटनांकडून धक्कादायक प्रकार उजेडात

वार्ताहर/ चिपळूण

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील उर्ध्वा, हरिश्री व रिंकल या कंपन्यांनी आपल्या आवारातच खड्डे मारून सांडपाणी सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. चिपळुणातील विविध संघटनांनी कारखान्यांवर धडक देत प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱयांच्या उपस्थितीतच या गंभीर प्रकाराची पोलखोल केली. या प्रकाराची 5 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत पाहणी केली जाणार आहे.

या औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्या तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वसाहतीतील उर्ध्वा केमिकल, हरिश्री ऍरोमेटिक्स व ओंकार स्पेशालिस्ट (रिंकल) या कंपन्या आपल्या आवारातच मोठमोठे खड्डे मारून त्यामध्ये आपले रासायनिक सांडपाणी सोडतात.  याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते, महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुजफ्फर उर्फ राजेश मुल्लाजी, मानवाधिकार संघटनेचे कोकण अध्यक्ष उदय घाग, कुणबी सेना संघटक समीर कदम तसेच पिरलोटे येथील अविनाश चाळके यांच्याकडे केली होती. त्यानुसार या सर्वांनी काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अजय चव्हाण यांच्यासह या तीनही कारखान्यात धडक दिली.

यामध्ये पाहणी करत असतानाच धक्कादायक प्रकार म्हणजे या कारखान्यांनी आपल्या आवारात 40 फूट रूंद आणि 50 फूट खोल खड्डे मारून त्यात रासायनमिश्रीत सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास आले. उर्ध्वा कंपनीच्या परिसरात एक टँकर संशयास्पद उभा होता. त्याची चौकशी कंपनी व्यवस्थापनाशी केल्यानंतर तो पाण्याचा टँकर असल्याचे मॅनेजर पाटील यांनी सांगितले. मात्र यावेळी या पदाधिकाऱयांनी टँकरचा नॉब उघडण्यास सांगितले तर त्यातूनही चक्क रसायन बाहेर आले. त्यामुळे पदाधिकाऱयांनी कंपनीविरोधात संताप व्यक्त केला गेला. शिवाय परिसरातील बॅरलमध्येही रसायन भरून ठेवण्यात आल्याचे या पदाधिकाऱयांनी अधिकाऱयांसमोर उघड केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चव्हाण यांनी तेथे पंचनामा करून रसायनमिश्रित सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत.

दरम्यान  प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात तक्रारी केल्यानंतर पहिल्या लेखी तक्रारी करा, नंतर आम्ही कारवाई करतो, अशी उत्तरे यंत्रणांकडून मिळत असल्यानेच या संघटनानी आक्रमक पाऊल उचलले. यासंदर्भात गुरूवारी दुपारी 12 वाजता या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, खेड येथील प्रांताधिकारी, तहसीलदार, आवाशी ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाहणी करण्यासाठी बोलावले आहे.

Related posts: