|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता पोस्ट देणार घरपोच पार्सल डिलिव्हरी

आता पोस्ट देणार घरपोच पार्सल डिलिव्हरी 

खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत पोस्टाची एन्ट्री : कमी वेळेत मिळणार पार्सल

सुशांत कुरंगी

मोठी व्यावसायिक पार्सल पाठवायची किंवा मागवायची असतील तर खासगी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येत होते. परंतु आता या स्पर्धेमध्ये पोस्ट विभागाने एन्ट्री घेतली आहे. कमी वेळेत बेळगाव शहरातील नागरिकांना पार्सलची डिलिव्हरी केली जाणार आहे. नवीन वर्षामध्ये बेळगावच्या नागरिकांना ही नवी सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पोस्ट विभागाकडून नागरिकांना कमी वेळेत घरपोच पार्सल डिलिव्हरी सेवा पुरविली जाणार आहे. सायकलवरून पत्र पोहोचविणारा पोस्टमन आता दुचाकी किंवा चारचाकीवरून पार्सलची डिलिव्हरी करताना आपणाला दिसणार आहे.

मध्यंतरी पोस्ट विभागाला मरगळ आली होती. त्यामुळे पत्र वगळता इतर सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोस्ट कार्यालयाचे महत्त्व कमी होत होते. परंतु आलेली मरगळ झटकून पोस्ट विभाग पुन्हा एकदा नव्याने सर्वांसमोर आला. यात विविध सेवा-सुविधा सुरू करण्यात आल्या. खासगी कंपन्यांच्या तोडीला तोड देत सेवा देण्याचे काम पोस्ट कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

चकाचक वाहने करणार पार्सल

खासगी कंपन्यांच्या पेक्षाही कमी कालावधीत पार्सल मिळण्यासाठी पोस्ट तयार झाले आहे. सकाळी 11 पर्यंत नागरिकांना हे पार्सल वितरित करण्यात येणार आहेत. वेळेत पार्सल पोहोच करण्यासाठी पोस्टमनला दुचाकी तसेच चारचाकी देण्यात येणार आहेत. पार्सल करणाऱया पोस्टमनच्या मोबाईलवर De@He असून त्यावरून वस्तू मिळताच त्याची माहिती पाठविणाऱयालाही त्वरित मिळणार आहे.

असे असणार डिलिव्हरी सेंटर

सध्या ऍमेझॉन, फ्लीपकार्ट याबरोबरच इतर खासगी डिलिव्हरी कंपन्यांकडून पार्सलची डिलिव्हरी करण्यात येते. आता पोस्ट कार्यालयानेही ही सेवा सुरू केली आहे. यासाठी बेळगाव येथील मुख्य पोस्ट कार्यालयात स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात आले आहे. याला ‘नोडल डिलिव्हरी सेंटर’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये आलेली पार्सल त्वरित सकाळी 11 च्या आता नागरिकांना देण्यात येतील. ही संपूर्ण व्यवस्था ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये गती येणार आहे.

या मिळणार सुविधा

नागरिक आता आपल्याला हव्या असणाऱया वस्तू पोस्ट कुरिअरमधून पाठवून देऊ शकतात. खासगी कंपन्यांकडून बऱयाच वेळा पार्सल गहाळ होण्याचे प्रकार घडतात. परंतु ही सरकारी सेवा असल्यामुळे विश्वास अधिक आहे. बेळगाव शहर मर्यादित ही सेवा असून तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ती विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहक आपले व्यावसायिक पार्सल आता पोस्टाच्या माध्यमातून पाठवू शकतात.

मुख्य पोस्ट कार्यालयात स्वतंत्र कार्यालय-

एस. डी. कुलकर्णी (अधीक्षक, पोस्ट कार्यालय)

खासगी कंपन्यांच्या धर्तीवर आता पोस्ट कार्यालयातर्फे नोडल डिलिव्हरी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मुख्य पोस्ट कार्यालयात यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. नवीन वर्षात पोस्टाकडून ही सुविधा सुरू केली जात असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट अधीक्षक एस. डी. कुलकर्णी यांनी केले. 

 

Related posts: