|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कांदा 15 हजार रुपये क्विंटल!

कांदा 15 हजार रुपये क्विंटल! 

यंदाच्या दरातील उच्चांक मोडीत काढत विक्रमी भावाची नोंद

वार्ताहर/ कंग्राळी खुर्द

बेळगाव एपीएमसीमध्ये बुधवारी लाल कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 15 हजार रुपये झाला. कांदा दराने यंदाच्या दरातील उच्चांक मोडीत काढत विक्रमी भावाची नोंद केली. गेल्या काही महिन्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱया नवीन कांद्याची आवकसुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे एक महिना लांबली. यामुळेच बुधवारी कांदा दराने 15 हजारचा टप्पा गाठल्याची माहिती व्यापारी सिद्धार्थ नरेगुळी यांनी दिली.

यंदा सततच्या पावसामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असताना कांदा उत्पादक शेतकऱयांना मात्र दिलासा मिळाला आहे. बुधवारच्या बाजारात कांदा दरात 5 हजार रुपये तर सफेद कांदा दरात 2 हजार रु. प्रतिक्विंटल वाढ झाली. बाजारात एकूण 30 ट्रक कांदा आवक होती. त्यामध्ये 5 ट्रक कांदा सफेद तर उर्वरित लाल कांदा होता.

बेळगाव बाजाराला प्रति बाजार 60 ट्रक कांद्याची गरज आहे. मात्र आजच्या बाजारात फक्त 30 ट्रक कांदा आवक झाली.

बाजारपेठेतील कांद्याचे दर

गोळी 3000 ते 4500 रु.

गुलटा 5000 ते 8000 रु.

मध्यम 10000 ते 12000 रु.

गोळा 14000 ते 15000 रु.

सर्वसाधारण कांदा भाव 7000 ते 9000 रुपये.

सफेद कांदा 8000 ते 10000 रु.

बेळगाव परिसरातील शेतकरी सुगी हंगामात गुंतले आहेत. त्यामुळे जवारी बटाटा आवकेत घट झाली आहे. तसेच लसूण उत्पादन क्षेत्रातही पावसाचा फटका बसला आहे. लसूण उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तुटवडय़ामुळे लसणाचे दरसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. खानापूर, चंदगड तालुक्यातून रताळी आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याचा भाव 300 ते 1400 रुपये प्रतिक्विंटल आहे.

Related posts: