|Saturday, March 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 4 महिन्यांमध्ये भव्य राम मंदिर उभारणार

4 महिन्यांमध्ये भव्य राम मंदिर उभारणार 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा : अयोध्येत गगनाला भिडणारे मंदिर निर्माण करू

वृत्तसंस्था/ पाकुड 

 झारखंडच्या पाकुड येथील प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. शाह यांनी प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य करत अयोध्येत भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचा कालावधीही निश्चित केला आहे. चार महिन्यांच्या आत गगनाला भिडणारे भव्य राम मंदिर अयोध्येत उभारले जाणार असल्याचे शाह यांनी जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येसंबंधी अलिकडेच निर्णय दिला आहे. 100 वर्षांपासून जगभरातील भारतीयांनी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याची मागणी लावून धरली होती. भव्य राम मंदिर आता अयोध्येत उभारले जाणार आहे. काँग्रेस पक्ष विकास घडवून आणू शकत नाही, देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही, तसेच देशातील जनतेच्या भावनांचा आदरही करू शकत नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा समजून घ्या असे आवाहन विद्यार्थ्यांना करतो. कायदय़ात कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही, पण काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष देशाची दिशाभूल करू पाहत आहेत. देशात हिंसाचाराचे वातावरण निर्माण करत आहेत. या मार्गावरून माघारी पत्करा, या मार्गावर कुणाचेच भले होत नसल्याचे आवाहन काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेसला करू इच्छितो असे शाह यांनी म्हटले आहे.

भाजपकडून निर्मिती अन् विकास

कित्येक वर्षापर्यंत झारखंडच्या तरुणाईने लढा देऊनही काँग्रेसच्या काळात राज्याची निर्मिती झाली नव्हती. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यावरच झारखंडची निर्मिती झाली. वाजपेयी यांनी झारखंडची निर्मिती केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमध्ये विकास घडवून आणण्याचे काम केल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.

धर्मांतराला आळा

झारखंडमध्ये बळजबरीने होणाऱया धर्मांतराला आळा घालून भाजप सरकारने आदिवासींचे जीवन सुरक्षित केले आहे. भाजपने आरोग्याच्या क्षेत्रात एम्स तसेच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून गरिबांची चिंता दूर केली आहे. तर मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारे हेमंत सोरेन हे राहुल गांधी यांच्या खांद्यावर बसून झारखंडमध्ये हिंडत आहेत. झारखंडमध्ये काश्मीरचा मुद्दा का मांडता असे राहुल गांधी विचारत आहेत. राहुल यांच्या डोळय़ावर इटालियन चष्मा असल्यानेच त्यांना झारखंडच्या तरुणांनी काश्मीरसाठी रक्त सांडल्याचे ज्ञात नसावे.  काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग रहावा अशी पूर्ण देशाची इच्छा असल्याचे म्हणत शाह यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे. 

योगी आदित्यनाथही उतरले प्रचारात

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराकरता भाजपने पूर्ण जोर लावला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जामताडा येथील प्रचारसभेला संबोधित केले आहे. एखादा इरफान अंसारी विजयी झाल्यास अयोध्येत राम मंदिर कसे उभारले जाणार? हे केवळ मंदिर नसून भगवानाच्या जन्मभूमीवर निर्माण होणारे राष्ट्रमंदिर असून त्यात भारताचा आत्मा विराजमान असणार असल्याचे योगींनी म्हटले आहे.

500 वर्षांमध्ये हिंदूंनी 176 वेळा लढाई लढली, कित्येक लाख हिंदूंनी रामजन्मभूमी प्राप्त करण्यासाठी प्राणांची आहुती दिली. भारताची लोकशाही, न्यायपालिकेचे सामर्थ्य तसेच भाजप सरकारकडून सुरक्षेचे वातावरण निर्माण झाल्याने राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाल्याचा दावा योगींनी केला आहे.

काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यासह हिंदुस्थानच्या संस्कृतीलाच नुकसान पोहोचविले आहे. भारताचा प्रत्येक वनवासी, आदिवासी, दलित आणि समाजाचा प्रत्येक सदस्य हे आमचे राम मंदिर असल्याचे म्हणू शकणार आहे. काँग्रेसकडून प्रत्येक विषय लटकविला जात होता. काँग्रेसचे सहकारी हिंदूंचा छळ करत होते. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोदींच्या कार्यकाळामुळेच प्रशस्त झाल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.

 

Related posts: