|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » रेल्वेची नासधूस करणाऱ्यांना शूट ऍट साईटचा इशारा …सुरेश अंगडी

रेल्वेची नासधूस करणाऱ्यांना शूट ऍट साईटचा इशारा …सुरेश अंगडी 

प्रतिनिधी / हुबळी

संसदेने नुकत्याच संमत केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्याचे निमित्त करुन रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस करण्याचे प्रकार कोणी करत असेल तर ते सहन केले जाणार नाहीत, असा इशारा रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी दिला आहे. नासधूस करणाऱया समाजकंटकांविरोधात दिसताक्षणी गोळी झाडण्याचा आदेश पोलिसांना द्यावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारांकडे केली आहे. ते मंगळवारी येथे आयोजित रेल्वेच्या एका कार्यक्रमात भाषण करीत होते.

पश्चिम बंगाल व इतर काही राज्यांमध्ये आंदोलन कर्त्यांनी रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. केवळ तोडफोडच नव्हे तर मालमत्तेला आगी लावण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. रेल्वेच्या मालमत्तेचे असे नुकसान होत असल्याने रेल्वे कर्मचाऱयांच्या मनोधैर्यावर विपरित परिणाम होत आहे. जाळपोळीच्या प्रकारांचे व्हिडीओ समाज माध्यामांवरून प्रसारीत केले जात आहेत. त्यांचाही वाईट परिणाम समाजावर होत असून नासधूस व जाळपोळ करणाऱया समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

हुबळी – बेंगळूर रेल्वेची चाचपणी

कर्नाटकातील मंत्री जगदीश शेट्टर यांनी हुबळी – बेंगळूर जलदगती गाडी सुरु करावी अशी मागणी केली आहे. ती रेल्वे विभागाच्या विचाराधिन असून अशा जलदगती गाडीची शक्यता अजमावली जात आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिदर – गुलबर्गा – बेंगळूर आणि मंगळुर- बेंगळूर अशा नव्या रेल्वे गाडय़ा सुरु करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हुबळीत रेल्वे कर्मचारी नियुक्ती मंडळ स्थापनेचा लाभ युवकांना होईल. या मंडळाच्या कार्यालयात कागदपत्रांच्या ऑनलाईन तपासणीची सोय असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वे अधिकाऱयांना काही सुचना केल्या. तर जगदीश शेट्टर यांनी हुबळी – अंकोला रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला. तसेच कित्तूर मार्गे धारवाड ते बेळगाव अशी रेल्वे सुरु करावी. या कार्यक्रमाला आमदार अरविंद बेल्लद, प्रदीप शेट्टर, नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. सिंग, रेल्वे कर्मचारी नियुक्ती मंडळाचे अध्यक्ष काशी विश्वनाथ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related posts: