|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अनुराधा पाटील यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’

अनुराधा पाटील यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ 

पुणे/ प्रतिनिधी

सुप्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहासाठी यंदाचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोंकणीमध्ये निलबा खांडेकर यांची साहित्य अकादमीकरिता निवड झाली आहे.

साहित्यविश्वात साहित्य अकादमी हा मानाचा पुरस्कार मानला जातो. यंदा मराठीत या मानाच्या पुरस्काराकरिता पाटील यांची निवड झाली आहे. ताम्रपत्र व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीतील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

कवयित्रीचा गौरव

अनुराधा पाटील या मराठीत एक नामवंत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म जळगावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात 1953 मध्ये झाला. दिगंत, तरीही दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘कदाचित अजूनही’ हा त्यांचा अलीकडचा काव्यसंग्रह. ‘आता तुझा पैस ओलांडून मला नुसतं कवितेत तरी राहू दे, निदान तळटीप बनून राहता येईल, एवढी भुई तरी माझ्या वाटय़ाला येऊ दे,’ असे सांगणारी ही कविता आहे. या कवितेचा आता गौरव होत आहे.

याशिवाय काही कथा, उडिया कवितांची भाषांतरे, हिंदी कथा व कवितांची भाषांतरे, समकालीन कवितेवर समीक्षणपर लेख, वाङ्मयीन मुलाखती व भाषणे अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. अनुराधा पाटील यांची कविता या नावाने डॉ. दादा गोरे यांनी संपादित केलेल्या 272 पानांचा ग्रंथ 2006 साली प्रतिमा प्रकाशन, पुणे या संस्थेने प्रसिद्ध केला असून, त्यात मान्यवरांचे लेख आहेत.

Related posts: