|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘डीबीजे’ला विद्यापीठाचा दर्जा मिळावा

‘डीबीजे’ला विद्यापीठाचा दर्जा मिळावा 

वार्ताहर/ चिपळूण :

शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असणारे चिपळुणातील डीबीजे महाविद्यालय हे कोकणातील नामवंत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला स्वायत्त होण्यासाठी विद्यापीठाचा दर्जा मिळावा, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

  येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात गुरूवारी ‘विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड सायन्स लॅबोरेटरी’ या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाच्या दिशाही दिवसेंदिवस बदलत आहेत. 1993 साली नवीन शैक्षणिक धोरण आले तेव्हापासून तर आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था अधिकच गतिमान झालेली आहे. शिक्षण व्यवस्थच्या प्रगतीची कास धरत येथील डीबीजे महाविद्यालयानेही शैक्षणिक कार्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास हे महाविद्यालय स्वायत्त होईल. शैक्षणिक चळवळीत योगदान देणारी महाविद्यालये स्वायत्त होत नाहीत तोवर गोरगरीब लोकांची प्रगती होणार नाही. भारतात आज लिबरल शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचा आई-वडिलांशी होणारा संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत आहे. तो वाढल्याशिवाय विद्यार्थ्यांची जडण-घडण होणार नाही. प्राचीन भारताला ज्ञानाचा फार मोठा वारसा आहे. याच भारतात तक्षशिला, नालंदा,  वल्लभी, विक्रमशिला अशी अनेक नामांकित विद्यापीठे अस्तित्वात होती. या विद्यापीठात बाहेरच्या देशातील विद्यार्थ्यांनी येऊन शिक्षण घेतले. या विद्यापीठात पाली, अर्धमागधी, संस्कृत आणि विज्ञान असे अनेक महत्वाचे विषय हे शिकवले जात होते. शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार असल्याचे मतही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केले.

   यावेळी विनती ऑरगॅनिक्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर ऍन्ड सीईओ विनती सराफ-मुत्रेजा यांनी प्रयोगशाळेला व त्या प्रयोगशाळेत शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रयोगशाळेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन डॉ. नितीन करमळकर व विनती ऑरगॅनिक्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन विनोद सराफ, प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण बाळ  यांच्याहस्ते करण्यात आले.

Related posts: