|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राज्यस्तरीय विजेत्या मल्लासाठी वर्षभर सराव शिबिर राबवणार

राज्यस्तरीय विजेत्या मल्लासाठी वर्षभर सराव शिबिर राबवणार 

फिरोज मुलाणी/ औंध

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱया मल्लांची निवड करून कात्रज  येथील स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रावर सराव कॅम्प आयोजित करून त्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि त्यांच्या खर्चाचा भार परिषद उचलणार आहे. यासाठी एक विदेशी प्रशिक्षकासह पाच प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल गेला पाहिजे हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ध्येय आहे. कुस्तीगीर परिषदेने याकरिता खास आराखडा तयार करण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करून या आराखडय़ाला मूर्त स्वरूप देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लांडगे यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिलखुलास बातचीत करून पुढील चार वर्षाची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची दिशा स्पष्ट केली. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रात त्यांचा वारसदार निर्माण झाला नाही हे दुर्दैव आहे. मात्र यासाठी शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेने ठोस पावले उचलली आहेत. त्याचे परिणाम लवकरच दिसतील. याशिवाय सराव शिबिरात विशेष गुणवत्ता सिध्द करणाऱया मल्लाला विदेशात देखील प्रशिक्षण देण्याचे परिषदेच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिह्यात पंचाचा अद्ययावत संच निर्माण व्हावा यासाठी नवीन मल्लांना पतियाळा येथे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदललेल्या कुस्ती नियमांची पंच आणि प्रशिक्षक यांना माहिती व्हावी याकरिता विभागनिहाय शिबिराचे आयोजित करून जागृती करण्याचे काम सुरू आहे. सरकार महाराष्ट्रातील कुस्ती जपण्यासाठी सकारात्मक आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी यांनी देखील कुस्तीला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या सहकार्यातून प्रत्येक जिह्यात कुस्ती संकूल उभे करण्याचा परिषदेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून सिटी कार्पोरेशनसारखे अतिशय चांगले प्रायोजक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मिळालेले आहेत. महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, ललित लांडगे, चंद्रशेखर शिंदे यांनीदेखील विशेष मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रायोजकांनी परिषदेला दिलेल्या रॉयल्टीतून वर्षभर राबविण्यात येणाऱया सराव शिबिरातील मल्लावर खर्च करण्यात येईल. आता जिल्हा स्तरावर होणाऱया स्पर्धेकरिता प्रायोजक मिळवून देण्यासाठी परिषद पुढाकार घेईल. कुस्तीच्या विकासासाठी अनेक प्रायोजक पुढे येत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मल्लांनी मेहनत करून पुढे वाटचाल करावी, डोपिंगसारख्या अमिषाला बळी पडू नये त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणे आहेत. परिषदेने देखील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मल्लांची डोपिंग चाचणी करावी, अशी मागणी आपण नाडाकडे केल्याचे त्यांनी सांगितले 

Related posts: