|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर ‘कमळ’ फुलले

उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर ‘कमळ’ फुलले 

प्रतिनिधी/उस्मानाबाद

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंत यांनी आमदार ठाकूर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपाला साथ दिली. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली.

 उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत, आ.ज्ञानराज चौगुले यांचे गट एकत्र आल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 30 विरुद्ध 23 मतांनी अस्मिता कांबळे यांची अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी धनंजय सावंत यांची निवड झाली. तानाजी सावंत यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिल्यामुळे जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरलेल्या अंजली शेरखाने यांच्यासोबत शिवसेनेचे बाळासाहेब जाधव एकमेव जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांना पाठींबा दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी जिह्यात मात्र संभ्रमाचे वातावरण होते. राष्ट्रवादी सोडून भाजपवाशी झालेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलली. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. परंतु तानाजी सावंत यांच्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर हे एकाकी पडले आहेत.

 जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी 28 हा बहुमताचा आकडा पार करावा लागणार होता. जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील आमदार झाल्यामुळे सेनेचे संख्याबळ दहा झाले आहे. आज झालेल्या निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील गट 17, तानाजी सावंत-चौगुले गट 7, भाजप 4, अपक्ष 1 आणि काँग्रेस 1 याप्रमाणे 30 मते मिळून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर भाजपाने कब्जा केला. तर शिवसेनेच्या कांबळे या गैरहजर राहिल्यामुळे अध्यक्षपदाच्या शिवसेनेचे उमेदवार अंजली शेरखाने यांना शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे बारा व राष्ट्रवादी 9 याप्रमाणे तेवीस मतांवर समाधान मानावे लागले. जिह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच बापानंतर लेकीचा जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर निवड झाल्याचा इतिहास जिल्हाभर चर्चिला जात आहे.

आघाडीत फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस महाविकास आघाडीचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. शरद पवार यांच्या आदेशानंतर भूम परंडय़ाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राणाजगजितसिंह पाटील यांची साथ सोडून महाविकास आघाडीला कौल दिला तर तानाजी सावंत यांनी त्यांच्या गटाचे सात सदस्य भाजप सोबत गेले. त्याचबरोबर ज्ञानराज चौगुले यांच्या गटानेही भाजपला साथ दिल्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे कमळ फुलले आहे.

Related posts: