|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तो आणि ती

तो आणि ती 

“अहो, सखुबाई यायची वेळ झाली.’’

“मग मी काय करू? पुष्पगुच्छ देऊन सखुबाईचं स्वागत करू? पण ती तर रोजच येते. कधी कधी उशीर करते किंवा दांडी मारते. पण हल्ली दांडी मारताना ती व्हॉट्सअपवर सूचना देखील देते बरं का.’’

“तिच्या सूचनेचं कौतुक नका सांगू. व्हॉट्सअपवर तिचा मेसेज आल्यावर आपण तिला फोन केला की तो कधीच लागत नाही. एअरोप्लेन मोडवर फोन टाकते मेली.’’

“छे गं, एअरोप्लेन मोड काय? तिला एवढा अवघड शब्द माहिती तरी असेल का?’’

“शब्द माहिती नसेल. पण तो पर्याय नक्की माहिती आहे. अहो सकाळी जरा बागेत जाऊन बघा. लव्ह शब्दाचं स्पेलिंग लिहिता न येणारी नखाएवढी कार्टी लव्ह करताना दिसतील.’’

“तू बागेत वजन कमी करायला जातेस की तरुण पिढीवर वॉचमनगिरी करायला?’’

“उगाच मला चिडीला आणू नका हं. मी तुम्हाला काय बरं सांगत होते?’’

“हे असंच होतंय हल्ली तुझं. एक गोष्ट सांगायला येतेस नि वेगळेच विषय निघतात. त्या कौटुंबिक मालिका नाही का, एका विषयावर सुरू होतात नि प्रत्येक एपिसोडमध्ये-’’

“माझ्या माहेरच्या लोकांची आणि मला आवडणाऱया मालिकांची टिंगल केलेली मला मुळीच खपणार नाही.’’

“नाही करत टिंगल. पण तू काहीतरी सखुबाई येण्याबद्दल सांगत होतीस, ते काय होतं?’’

“आत्ता आठवलं. सखुबाई यायची वेळ झाली आणि तुम्ही पारोसे बसलाहात.’’

“त्याला काय होतंय? मी पारोसा बसेन नाहीतर उटणं लावून स्नान करीन. सखुबाईचा काय संबंध?’’

“अहो, ती येऊन गेल्यावर तुमचे कपडे कोण धुवील? म्हणून म्हणते, ती यायच्या आधी छान आंघोळ करून कपडे बदला. मग मी तुमच्यासाठी कांदेपोहे करते. काल कांदे स्वस्त मिळालेत.’’

“कांदे स्वस्त मिळाले म्हणून माझ्यासाठी कांदेपोहे करणार आहेस ही आनंदाची गोष्ट आहे. पण आधीच बजावतो. उद्या सोन्याचे भाव कमी झाले म्हणून लगेच एखादा दागिना मागितलास तर जमणार नाही हं. त्याऐवजी दर शनिवारी तुझ्या आवडीची एकेक भाजी आणत जाईन! मग ती स्वस्त मिळो की महाग.’’  

“पक्के आहात. शनिवारी माझ्या डोक्मयावर भाजी आणून टाकणार आणि रात्री मित्रांबरोबर पार्टीला जाणार. पण आता बऱया बोलाने आंघोळीला जा कसे.’’

Related posts: