|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » झेडपी निवडणुकीसाठी खाणी ठेवणीतले अस्त्र

झेडपी निवडणुकीसाठी खाणी ठेवणीतले अस्त्र 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील खाण बंदीचा विषय हा निवडणुकीसाठी ठेवणीतले अस्त्र बनला आहे. 2012 पासून आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत हा विषय तापविला जातो. आता जिल्हा पंचायतीच्या (झेडपी) पार्श्वभूमीवर पुन्हा खाण विषय तापविण्याची तयारी चालली आहे. महत्वाचे म्हणजे मागील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आदल्या रात्री खाणपट्टय़ात पेढे वाटून व फटाके फोडून उद्यापासून खाणी सुरू अशी वार्ता पसरविली होती.

जिल्हा पंचायत निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने  राजकीय पक्षांच्या पातळीवरून तयारी सुरू आहे. खाणबंदीचा विषय खाणपट्टय़ात धुमसत आहे. खाणबंदीमुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा असंतोष आहे. 2012 पासून खाणबंदीच्या समस्येने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो याची जाणीव सरकारला आहे. आता जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी खाणपट्टय़ातील असंतोष पुन्हा वर येऊ शकतो. त्यामुळे मायनिंग पिपल्स प्रंटच्या सहकार्याने खाण अवलंबितांना शांत करण्यासाठी पुन्हा बैठका सुरू करून खाणी सुरू करण्याची आश्वासने देण्याची तयारी चालली आहे.

मागील जि. पं. निवडणुकीवेळी फसवणूक

2015 मध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशी खाणपट्टय़ात फटाके फोडले व पेढे वाटून उद्यापासून खाणी सुरू होणार अशी वार्ता पसरविली गेली. मात्र त्याचा फार मोठा परिणाम खाणपट्टय़ात झाला नाही. भाजपने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही 50 पैकी केवळ 19 जागा भाजपला मिळाल्या तर अपक्ष निवडणूक लढविलेले 25 उमेदवार निवडून आले. मगोचे 6 उमेदवार निवडून आले होते. यावेळीही जि. पं. निवडणुकीत खाणपट्टय़ात गोंधळ होऊ शकतो याची जाणीव असल्याने आता मायनिंग पिपल्स प्रंटमार्फत डॅमेज कंट्रोलची तयारी सुरू आहे.

प्रत्येक निवडणुकीत खाण विषयाचे भांडवल

विधानसभा, लोकसभा व जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी दरवेळा खाण विषयाचे भांडवल केले गेले. प्रत्येक निवडणुकीला खाणी लवकरात लवकर सुरू होतील असे आश्वासन सरकारने दिले, पण खाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गोवा मायनिंग पिपल्स प्रंट सक्रीय झाला होता. सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा प्रंटने केली होती. प्रंटचे नेते पुतू गावकर यांनी सरकारच्या विरोधात प्रंट आक्रमक होईल व खाणपट्टय़ात सरकारला विरोध केला जाईल, अशी घोषणा केली होती. थिवीपासून सावर्डेपर्यंत सभा घेण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात अवघ्या काही सभा घेतल्या गेल्या. लोकसभा निवडणुकी अगोदर या नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडले. शिस्तबद्ध पद्धतीने खाण अवलंबित व खाणपट्टय़ातील लोकांना फसविण्याचे कारस्थान केले जात आहे. आता जि. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायनिंग पिपल्स प्रंटला पुन्हा सक्रीय केले जाण्याची शक्यता आहे.

Related posts: