|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निम्मे भाडे भरल्यासच टाळे खोलू

निम्मे भाडे भरल्यासच टाळे खोलू 

प्रतिनिधी/ बेळगाव

भाडे थकल्याने मटण मार्केटमधील 40 गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई महापालिकेने केली. त्यामुळे गाळेधारकांनी मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्तांकडे धाव घेऊन थकीत भाडे हप्त्याने भरण्याची मुभा देण्याची मागणी केली. पण थकीत भाडय़ाच्या एकूण रकमेपैकी निम्मी रक्कम भरल्यास टाळे खोलण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले. यामुळे निम्मी रक्कम भरण्याची तयारी गाळेधारकांनी दर्शविली आहे.

नागरिकांच्या आणि मटण विपेत्या व्यापाऱयांच्या सोयीसाठी मटण मार्केटच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, वाढीव भाडे भरण्यास गाळेधारकांनी टाळाटाळ चालविली असल्याने थकीत भाडय़ाच्या रकमेचा आकडा 46 लाखापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे भाडे भरण्याची सूचना महापालिकेच्या महसूल विभागाच्यावतीने गाळेधारकांना करण्यात आली होती. पण याकडे गाळेधारकांनी दुर्लक्ष केले होते. वारंवार सूचना देऊनही गाळय़ांचे भाडे भरले नसल्याने मटण मार्केटमधील 40 गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. परिणामी मटण मार्केटमधील मटण विपेत्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मार्केटमधील गाळेधारकांनी मंगळवारी महापालिका कार्यालयात धाव घेऊन महापालिका आयुक्तांची भेट घेतली. गरीब व्यापारी असून व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतो. त्यामुळे भाडे भरण्यासाठी मुदत देण्याची विनंती महापालिका आयुक्तांकडे केली. हप्त्याने भाडे भरण्याची मुभा देण्यात यावी, तसेच मार्केट परिसरातील कचऱयाची उचल करावी तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी गाळेधारकांनी केली.

गाळेधारकांनाच नव्हे शहरातील सर्व जनतेला स्वच्छता हवी आहे, याची जाणीव आहे. गाळेधारक महापालिकेच्या मालकीच्या गाळय़ांमध्ये व्यवसाय करतात. पण  भाडे जमा करीत नाहीत. महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यास नागरी सुविधा कशा उपलब्ध करणार, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध असल्यासच शहरवासियांना सर्व सुविधा उपलब्ध करता येऊ शकतात. त्यामुळे वेळेवर भाडे भरण्याची सूचना केली. तसेच 46 लाखांपैकी निम्मी रक्कम भरल्यानंतरच गाळय़ांचे टाळे काढण्यात येतील, असे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले. थकीत रकमेपैकी 25 टक्के रक्कम भरण्याची तयारी गाळेधारकांनी दर्शविली. 50 टक्के रक्कम भरल्यासच टाळे काढण्याची परवानगी मनपा प्रशासक जिल्हाधिकाऱयांकडून मिळू शकते. त्यामुळे निम्मी रक्कम आता भरा. उर्वरित रक्कम भरण्यास मुभा दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. यामुळे याबाबत मटण विपेत्यांनी चर्चा करून निम्मे भाडे भरण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यावेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर तसेच मटण मार्केटमधील गाळेधारक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: