|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रामाणिकपणे काम करा, कोणतेच काम प्रलंबित राहणार नाही

प्रामाणिकपणे काम करा, कोणतेच काम प्रलंबित राहणार नाही 

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रशासकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर डॉ.एस.बी.बोमनहळळी यांनी प्रथमच महापालिकेला भेट देवून आढावा घेतला. राबविण्यात येणाऱया विकासकामाची माहिती घेवून प्रलंबित कामे वेळेवर पुर्ण करण्याची सुचना केली. अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे काम केल्यास कोणतेच काम अपुर्ण रहात नाही. त्यामुळे  अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे कामे करावीत असा कानमंत्र जिल्हाधिकाऱयांनी मनपा अधिकाऱयांना दिला.

महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळळी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मागील आठवडय़ात प्रशासकपदाचा कार्यभार घेतला होता. मात्र कार्यालयाला भेट दिली नव्हती. सोमवारी कार्यालयाला भेट देवून आढावा बैठक घेणार असल्याची सुचना मनपाला दिली होती. त्यामुळे सोमवारी सकाळपासुन सर्वच अधिकारी महापालिका कार्यालयात ठाण मांडून होते. पण जिल्हाधिकारी दुपारपर्यत आले नाही. बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दुपारी दिली. यामुळे रद्द झालेली बैठक मंगळवारी घेतली. यावेळी महापालिकेच्या कारभाराची माहिती घेवून अधिकाऱयांना विविध सुचना केल्या. शहरात होणाऱया पाणी पुरवठयाचा आढावा घेवून पाणी पुरवठयाच्या नियोजनची माहिती जाणून घेवून शुध्द आणि  सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याची सुचना केली. तसेच स्वच्छतेच्या कामाची माहिती घेतली असता, कचऱयाचे विघटन करून विल्वेवाट लावण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच घरोघरी जावून ओला आणि सुका कचरा करण्याची मोहिम संपुर्ण शहरात राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱयांनी संपर्क राहून कचऱयाची उचल करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा असे बजावले. तसेच विविध निधीमधून विकासकामे राबविण्यात येत असून याची माहिती जाणून घेतली. प्रलंबित कामाची माहिती घेवून कोणतीही विकासकामे राबविताना अडचणी निर्माण झाल्यास त्याची माहिती देण्याची सुचना केली. तसेच राखीव अनुदान आणि शिल्लक निधीमधून राबविण्यात येणाऱया कामाची माहिती घेतली. कामे प्रलंबित रहात नाही, आधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे कामे रखडतात. अधिकाऱयांनी प्रामाणिपणे कामे केल्यास कोणतेच काम प्रलंबित राहणार नाही. त्यादृष्टीने अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे कामे करून नागरीकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळळी यांनी बजावला. यावेळी महापालिका आयुक्त जगदीश के.एच यांच्या सहाय्यक उपायुक्त, शहर आभियंते आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts: