|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ठकी, भातुकली, सरकार वगैरे

ठकी, भातुकली, सरकार वगैरे 

लहानपणी म्हणजे साठेक वर्षांपूर्वी मुलींच्या खेळण्यांमध्ये एक चीज हमखास आढळायची. ती म्हणजे ठकी. ठकी कोण होती? सागवानी लाकडाचा सहा-सात इंची दंडगोलाकृती तुकडा घेऊन त्यात चेहरा कोरून तैलरंग दिलेली बाहुली. तिचे रंग आकर्षक होते. चेहरा भन्नाट होता. चेहऱयावरचे भाव अंगापेराने दणकट असलेल्या त्या काळच्या खत्रूड नणंदा किंवा थोरल्या जावा किंवा सासवांप्रमाणे होते. शस्त्र म्हणून मारण्यासाठी ठकी उपयुक्त आणि मजबूत होती. मुलींची आपापसात मारामारी झाली तर जिच्या हातात ठकी असेल ती मुलगी महासत्ता असे. घरातली मुलगी किंवा मुली हळूहळू मोठय़ा होत. ठकीचे रंग विटत पण ती अडगळीत जात नसे. खिळे ठोकण्यासाठी, घट्ट बसलेली दाराची-खिडकीची कडी उघडण्यासाठी  तिचा हातोडीसारखा उपयोग होई. म्हणूनच तिचे नाव ठकी पडले असावे! ठकी अशी टिकाऊ होती. बाहुली म्हणून असलेला उपयोग संपला की हातोडी म्हणून कामाला यायची. क्वचितप्रसंगी उंदीर, घूस वगैरेंना फेकून मारण्यासाठी देखील वापरली जायची.

पण ठकी ठक नव्हती. कारण तिचा राजकारणाशी संबंध नव्हता. अर्थात त्या वेळच्या भोळसट राजकारणाशी संबंध आला असता तरी ठकीने ठकबाजी केली नसती.

आताच्या राजकारणात ठकीने काय केले असते? राजकीय पक्ष मजबूत लाकडापासून बनवलेल्या ठकीसारखेच मजबूत ठोकळे कार्यकर्ते बाळगतात. त्यांचे चेहरे सुरुवातीला ठकीसारखेच आकर्षक असतात. पण सत्तेवर आले की ते आकर्षक रंग विटतात. आतला दणकट कुरूप ठोकळा बाहेर येतो. मग तो समोरच्याच्या डोक्मयात बसतो. क्वचित समोरच्याच्या हातातदेखील त्याचा ठोकळा असतो. ज्याचा ठोकळा मजबूत तो जिंकतो.

पण हे ठोकळे ठकीसारखे निरागस नसतात. ठोकळे वापरणारे पुढारी ठकीशी खेळणाऱया मुलींसारखे निष्पाप नसतात. त्या छोटय़ा मुली आपापसात भांडायच्या. ठकी घेऊन मारामारी करायच्या. पण एकमेकींच्या जिवावर उठत नसत. थोडा वेळ भांडून पुन्हा एक व्हायच्या. भातुकलीतले संसारदेखील त्या पुरेशा गांभीर्याने घेत. भातुकलीच्या संसारात त्यांच्या नवऱयांची भूमिका करणारे मुलगेदेखील बायकोशी प्रेमाने  वागत. सगळेजण सगळे नियम, संकेत पाळत.

ती निरागस आणि शिस्तप्रिय बालके, त्या मल्टीपर्पज ठक्मया आणि ते भातुकलीचे खेळ कुठे गेले असतील? त्यांना शोधून त्यांच्या हातात सरकारे चालवायला दिली तर कशी चालतील?

Related posts: