|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवी मुंबई महापालिका संघास विजेतेपद

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवी मुंबई महापालिका संघास विजेतेपद 

वार्ताहर/ पाटण

येथील पाटण स्पोर्टस असोसिएशनने माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या स्व. दिनकरराव जगताप स्मृती चषक राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धा नवी मुंबई महानगरपालिका संघाने जिंकली. सुरेशकुमारच्या हरियाणा संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

        राष्ट्रीय पातळीवरील अनेक नामवंत संघातील खेळाडूंच्या नेत्रदीपक खेळाने अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबई महानगरपालिका आणि हरियाणा या संघामध्ये झाला. नवी मुंबई महानगरपालिका संघाच्या इश्तियाक आणि हरियाणाच्या सुरेशकुमार यांच्या अफलातून खेळाने क्रीडारसिकांची मने जिंकली. अंतिम सामन्यात नवी मुंबई महानगरपालिका संघाने हरियाणा संघावर मात करून प्रथम क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक जिंकला. सुरेशकुमारच्या हरियाणा संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तृतीय क्रमांक आयएससी मालेगाव तर चतुर्थ क्रमाकांचे पारितोषिक मध्यप्रदेश संघाने मिळवले. 

     पाटण स्पोर्टस् असोशिएशनने येथील नगरपंचायतीच्या मैदानावर उभारलेल्या कै.सौ.उमादेवी विक्रमसिंह पाटणकर क्रीडानगरीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय शुटींग बॉल स्पर्धेचा शुभारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक त्रुप्ती सोनवणे, याज्ञसेन पाटणकर व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्याबाहेरील संघांबरोबरच विदर्भ, मालेगाव, सांगली, पुणे, राजमाची, जामनेर, औरंगाबाद, सावर्डे, नवी मुंबई मनपा, एकता औरंगाबाद, भारती विद्यापीठ, भीमापूरवाडी कर्नाटक, माळशिरस, मनेराजुरी येथील संघांनी सहभाग घेतला होता.

   या स्पर्धां दरम्यान माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भेट दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटणाऱया कार्यकर्त्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी अखिल भारतीय शुटींगबॉल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी रवींद्र तोमर, राजस्थानचे ओ. पी. माचरा, उपाध्यक्ष राजू नांद्रेकर, महाराष्ट्र शुटींग बॉल असोशिएशनचे अध्यक्ष मनोहर साळवी, उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, कार्यकारिणी सदस्य अमजद जेलर, विष्णू निकम आदी पदाधिकाऱयांनी भेट देऊन 45 वर्षांपासून यशस्वीपणे स्पर्धा आयोजित करत असलेल्या पाटण स्पोर्टस् असोसिएशनचे कौतुक केले. 

     स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षक जयप्रकाश केडीएन, राजेंद्र मोहिते, स्पर्धा नियंत्रक नंदकुमार भोईटे, पंच जावेद मनोरे, अरविंद पाटील, सुरेश पाटील, विजय कोकीळ आदींसह पाटण स्पोर्टस असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

Related posts: