|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रकाश तळावडेकर यांच्या ‘एक क्षण’ पुस्तकाचे प्रकाशन

प्रकाश तळावडेकर यांच्या ‘एक क्षण’ पुस्तकाचे प्रकाशन 

 

प्रतिनिधी/ पणजी

मराठी तसेच हिंदीमधून लेखन करणारे गोमंतकीय साहित्यिक प्रकाश तळावडेकर यांच्या एक क्षण या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका तथा 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. उस्मानाबाद-महाराष्ट्र येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा प्रकाशन सोहळा पार पडला.

गोव्यातील लोक मराठीचे जतन आणि संवर्धन करण्याचे फार मोठे कार्य करत आहेत. अनेक गोमंतकीयांनी विपुल साहित्य निर्माण करुन मराठी साहित्यामध्ये बहुमोल भर टाकली आहे. कवि प्रकाश तळावडेकर यांनी आपल्या आयुष्यात जे क्षण अनुभवले ते या संग्रहामध्ये भावकोमल शब्दांतून उतरविले आहेत. त्यांच्या पुढील साहित्यनिर्मितीस आपण सुयश चिंतीते, असे अरुणा ढेरे यावेळी म्हणाल्या.

भावकोमल अनुभवसंचित : नाईक

एक क्षण या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिलेले दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक यांनी यावेळी बोलताना संग्रहाबद्दल सविस्तर माहिती देऊन हा एक आगळावेगळा संग्रह असल्याचे नमूद केले. साहित्य क्षेत्रात अनेक मान्यवर मंडळी तळावडेकर यांना भेटली, त्या क्षणांतील अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. हा संग्रह म्हणजे तळावडेकर यांचे भावकोमल अनुभवसंचित आहे, असेही ते म्हणाले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी तळावडेकर यांच्या या संग्रहाबद्दल प्रशंसा केली. साहित्यिकांनी असे वेगवेगळे प्रयोग करत रहावे, असही ते म्हणाले. प्रकाश तळावडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनेक मान्यवर साहित्यिकांकडून आपल्या लिहिण्याची तसेच जगण्याचीही प्रेरणा मिळाली. त्यांच्या सहवासाने चांगले अनुभव आले. साहित्यिकांनी आपल्याला खूप प्रेम दिले, आनंदी क्षण दिले, त्या सर्वांना एक क्षण या संग्रहात समाविष्ट केले आहे, असे ते म्हणाले.

Related posts: