|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गिरीत महामार्गाला अडथळा ठरणारे घर केले जमीनदोस्त

गिरीत महामार्गाला अडथळा ठरणारे घर केले जमीनदोस्त 

प्रतिनिधी/ म्हापसा

गिरी-म्हापसा येथील नवीन महामार्गास अडथळा ठरणारे एक घर काल बुधवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले, तर 11 घरांचा काही भाग पाडण्यात आला. कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

पणजी-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे चौपदरीकरणाचे काम गेली दोन वर्षे याभागात चालू आहे. गिरी जंक्शन परिसरात त्यासाठी भव्य उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. गिरी येथील हमरस्त्याच्या मार्गात येणाऱया अनेक जुन्या माडांचीही खुलेआम कत्तल करण्यात आली होती, त्यामुळे हा विषय स्थानिक पर्यावरणप्रेमींनी उचलून धरल्याने बराच वादग्रस्त ठरला होता.

घरमालकांना कोर्टातही अपयश

1979 साली या हमरस्त्याचे नियोजन करतेवेळी या भागातील अनेक घरांवर बुलडोझर फिरणार हे याआधीच स्पष्ट झाल्याने अनेकांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र त्यात त्यांना यश न आल्यामुळे सरतेशेवटी घरमालकांनी अखेरचा निर्णय राम-भरोसेच सोडून दिला होता. मंगळवारी सायंकाळी हमरस्ता प्राधीकरणाच्या अधिकाऱयांकडून एक-दोन दिवसात या भागातील हमरस्त्याला अडथळा ठरणारी घरे पाडण्यात येणार असल्याची पुसटशी माहिती आपल्याला दिली होती, असे घरमालक कालिदास वेर्णेकर यांनी सांगितले.

सरकारकडून मिळालेली मदत तुटपुंजी

मोठय़ा पोलीस फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झालेल्या सरकारी अधिकाऱयांनी घरातील सामान हलविण्याआधीच अवजड मशिनरीच्या सहाय्याने घरे जमीनदोस्त केली. घराच्या मोबदल्यात सरकारकडून मिळालेली आर्थिक मदत तुटपुंजी होती, असे लोटलीकर यांनी सांगितले.

पुनर्वसन होईपर्यंत लोकांबरोबर राहणार : साळगांवकर

साळगावचे आमदार जयेश साळगांवकर यांनी सांगितले की आपण विकासकामांच्या विरोधात नाही. या कारवाईत बेघर झालेल्या घरमालकांचे पुनर्वसन होईपर्यंत आपण लोकांबरोबरच राहणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत गिरीच्या सरपंच रिमा नाईक तसेच अन्य पंचायत सदस्य होते. गिरी हमरस्त्यातील बारा घरे जमीनदोस्त केल्याने हमरस्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Related posts: