|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रशंसनीय यश

प्रशंसनीय यश 

भारतासारख्या देशाला सर्व महासत्तांशी सलोख्याचे संबंध राखावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. काही दशकांपूर्वी अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाच्या गोटातील देश समजला जात असे. पण शीतयुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली. जगाची समीकरणे बदलली. त्या स्थितीत भारताला अमेरिकेशी घनिष्ट संबंध स्थापन करण्याची आवश्यकता जाणवू लागली. आपला जुना आणि कठीण समयी हमखास साहाय्यार्थ येणारा मित्र रशिया याला न दुखावता अमेरिकेशी संबंध जोडण्याचे आव्हान भारतासमोर होते. शीतयुद्धोत्तर काळात प्रारंभी हे आव्हान पेलणे अवघड गेले नाही. कारण रशिया आणि अमेरिकाच एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कालांतराने पुन्हा या दोन महासत्तांमध्ये कधी उघड तर कधी छुपा संघर्ष सुरू झाला. या दोन्ही देशांचे मध्यपूर्वेतील हितसंबंध एकमेकांच्या विरोधात आहेत. सीरियातील संघर्ष, इराण-अमेरिका संघर्ष, इराकशी संबंध इत्यादी मुद्दय़ांवरून खटके उडू लागले. रशियाने युक्रेनवर केलेला दावा, क्रिमियावर केलेले आक्रमण आदी घटनांनी दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवे तणाव निर्माण केले. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. अमेरिकेने रशियाला काळय़ा सूचीत टाकून रशियाशी संरक्षण सामग्री खरेदी व्यवहार जे देश करतील त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला. भारत नेहमीच रशियाकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रखरेदी करतो. रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षक यंत्रणा घेण्याचा करार भारताने केला आहे. अमेरिकेच्या इशाऱयामुळे हा करार धोक्यात येणार का, असा प्रश्न निर्माण झाला. भविष्यात भारतावर अमेरिका आणि रशिया याऐवजी अमेरिका किंवा रशिया, अशी निवड करण्याची वेळ येईल का, अशाही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. या दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याची तारेवरची कसरत भारताला किती काळ जमेल? ती जमली नाही तर भारताच्या परराष्ट्र आणि सामरिक धोरणावर कसा परिणाम घडेल? या दोन महासत्तांच्या टकरीत भारताच्या हितांचा बळी जाईल का असे अनेक प्रश्न तरळू लागले. समजा, भारताने या दोन महासत्तांपैकी एकीचा हात सोडला आणि ती महासत्ता पाकिस्तान व चीनच्या बाजूने गेली, तरी ती स्थिती भारत कशी हाताळणार आहे असेही विचारले जाऊ लागले. दहशतवादाच्या मुद्दय़ावर पाकिस्तानला चीनचा अपवाद वगळता अमेरिका, रशिया, फ्रान्स व ब्रिटन या चार महासत्तांपासून तसेच जगातील इतर बहुतेक सर्व देशांपासून एकटे पाडण्यात भारताला यश आले आहे. पण अमेरिका आणि रशिया यांच्याशी संबंधात समतोल राखण्यात अपयश आले तर पाकला एकटे पाडण्याच्या मुत्सद्देगिरीचे काय होईल  असेही मुद्दे उपस्थित केले जाऊ लागले. या सर्व स्थितीला पंतप्रधान मोदी यांची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत, मोदी अमेरिकेच्या नको इतके आहारी गेले आहेत, असे आरोप विरोधी पक्षांकडून केले जाऊ लागले. एकंदर परिस्थिती खरोखरच नाजूक म्हणावी तशी होती. पण दोन्ही महासत्तांना आपली भूमिका पटवून देण्याचे भारताचे प्रयत्न सर्व पातळय़ांवर सुरू होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी पुढाकार घेऊन ही तारेवरची कसरत यशस्वी करून दाखविण्याचा चंग बांधला होता. पंतप्रधान मोदींचीही या प्रयत्नांना साथ होती. भारत-रशिया मैत्रीचे महत्त्व आणि अपरिहार्यता अमेरिकेला समजावून देणे, मात्र त्याचबरोबर अमेरिकाही भारतासाठी किती जवळची आहे, हे ठसविणे, असे हे दुहेरी आव्हान होते व आजही आहे. मात्र या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे, असे दिसते. भारत आणि रशिया यांच्या संबंधांना बाधा पोहचणार नाही, अशा प्रकारे भारताशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले जातील, अशी अधिकृत स्पष्टोक्ती नुकतीच अमेरिकेने दिली आहे. याचा अर्थ असा होतो की भारताने रशियाशी जे अब्जावधी डॉलर्सचे संरक्षण सामग्री खरेदी करार केले आहेत, त्यांना अमेरिकडून विरोध केला जाणार नाही. तसेच भारतावर या करारांमुळे अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड देण्याची वेळ येणार नाही. तसे झाल्यास भारत दोन्ही महासत्तांशी एकाचवेळी जुळवून घेऊ शकतो. अमेरिका व रशियात जे ताणतणाव आहेत, ते दूर करण्याइतकी भारताची शक्तीही नाही आणि भारताचा तेव्हढा आंतरराष्टीय राजकारणावर प्रभावही नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे ताणतणाव असूनही या दोन्ही देशांशी जवळचे संबंध राखण्याचा प्रयत्न करणे, एवढेच भारताच्या हाती आहे हे देखील सत्य आहे. अशा स्थितीत भारत आणि रशिया संबंधांवर अमेरिकेने जी भूमिका आता घोषित केली आहे, ती निश्चितच भारताला दिलासादायक आहे, हे निश्चित. रशियाबरोबरचा कोणताही करार मोडावा न लागता, जर भारत अमेरिकेशीही जुळवून घेऊ शकत असेल तर ते महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय यश मानावे लागेल. अर्थात, अमेरिका किंवा रशिया यांनी दिलेल्या केवळ एका वक्तव्याने परिस्थिती पूर्णतः भारताच्या बाजूने झुकली आहे असे म्हणता येणार नाही. भविष्यकाळात हे तीन्ही देश एकमेकांकडे कशा दृष्टीने बघतात आणि दोन्ही महासत्तांच्या जवळीकीत राहण्यामध्ये भारताला दीर्घकालीन यश मिळते का हे पहावे लागणार आहे. पण सध्यातरी अमेरिकेने भारताची भूमिका समजून घेतल्याचे दिसून येते. तसेच रशियानेही भारत आणि अमेरिका यांच्या जवळीकीवर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. ही स्थिती भारतासाठी समाधानकारच आहे. ती तशीच टिकून रहावी, यासाठी भारताला आणखी प्रयत्न करावे लागणार हे उघडच आहे. पण या प्रयत्नांना यश मिळण्यास प्रारंभ झाल्याचे जे चित्र निर्माण झाले आहे ते महत्त्वाचे आहे. हे अवघड वाटणारे आव्हान भारताच्या राजकीय मुत्सद्दय़ांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारे हाताळले आहे, असे म्हणावयास जागा आहे. भारताच्या भविष्यकाळातील आंतरराष्ट्रीय भूमिकेला पूरक असे हे वातावरण आहे. ते तसेच रहावे, यासाठी भारताने अधिक सजगपणे प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे.

 

Related posts: