|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उघडय़ावर मद्यपान करण्यास बंदीची घोषणा केवळ नावापुरतीच

उघडय़ावर मद्यपान करण्यास बंदीची घोषणा केवळ नावापुरतीच 

प्रतिनिधी \ मडगाव :

कुंकळळी येथे भल्या पहाटे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱया सात युवकांनी गस्तीवरील पोलिसांना मारहाण करण्याची घटना घडली. त्यानंतर पोलीस खाते खडबडून जागे झाले व उघडय़ावर मद्यपान करण्यास बंदी घातली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. पण, ही घोषणा केवळ नावापुरतीच असल्याचे आत्ता सिद्ध झाले आहे.

मडगावच्या स्टेशनरोड, गांधी मार्केट परिसरात अनेक जण उघडय़ावरच मद्यपान करतात. पण, त्याच्यावर कोणीच कारवाई करत नाही. खुद्द दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उघडय़ावर मद्यपान करणाऱयांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण, मडगावच्या स्टेशनरोड व गांधी मार्केट परिसरात उघडय़ावर मद्यपान करणाऱयांकडे का दुर्लक्ष होते असा सवाल उपस्थितीत झालेला आहे.

काल गुरूवारी संध्याकाळी मडगावच्या स्टेशनरोडवर सहा जणांचा एक गट बिनधास्तपणे उघडय़ावरच मद्यपान करत होता. जेव्हा त्याचे छायाचित्र घेण्यात आले, तेव्हा दोघांनी दारूच्या बाटल्या लपविण्याचा प्रयत्न केला. तर उर्वरित चारजण बिनदास्तपणे दारूच्या बाटल्या घेऊन बसले होते.

दारूची नशा चढली की, या ठिकाणी धिंगाणा घातला जातो, त्याच बरोबर अनेकदा हाणामारीचे प्रकार देखील घडले आहेत. रात्रीच्यावेळी पाकीटमारी यासारखे प्रकार देखील या ठिकाणी होतात.

स्टेशनरोड बनावट दारूचा अड्डा

स्टेशनरोड परिसरात बनावट दारूची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असून अबकारी खाते या बनावट दारूवर कोणतीच कारवाई करीत नाही. अबकारी खात्याच्या आशीर्वादाने ही बनावट दारू याच भागात तयार केली जात असल्याची माहिती हाती आली आहे. ही बनावट दारू स्वस्त दरात मिळत असल्याने, ती पिणाऱयांची संख्या देखील बरीच मोठी आहे. ही बनावट दारू पिऊन या ठिकाणी अनेकांचा बळी गेलेला आहे. तरी सरकार याकडे पूर्णपणे डोळेझाक करीत आहे.

Related posts: