|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » 2020 मध्ये तेजीची संधी ?

2020 मध्ये तेजीची संधी ? 

यंदाचं 2020 हे वर्ष बांधकाम क्षेत्राच्या अपेक्षा वाढवणारं असून चांगली प्रगती साधेल असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर्षी जीडीपी 6 ते 6.5 टक्के इतका राहण्याचा अंदाज सल्लागार कंपनी नाइट प्रँकने वर्तवला असून बांधकाम क्षेत्रात काहीशी तेजी दिसून येईल, असेही मत व्यक्त करण्यात आलंय. त्याचबरोबर येत्या बजेटमध्ये गृहकर्ज व्याजावरील कर सवलत 4 लाखापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बांधकाम क्षेत्रासाठी नवं वर्ष लाभदायी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घरासाठी कर्ज घेणे यापुढे आणखी सोयीचे होणार असून त्यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पात घोषणा होणार असल्याचे संकेत आहेत. गृहकर्जाच्या व्याजावरील प्राप्तीकर सवलत मर्यादा 3 ते 4 लाख रुपये करण्याचा विचार सुरू असून या बातमीने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. अर्थात खरोखरंच सवलतीचा लाभ मिळवून दिला जाणार का, हे अर्थसंकल्पादिवशी स्पष्ट होणार आहे. सध्याला प्राप्तीकर कलम 24 अन्वये ही सवलत 2 लाखापर्यंत ग्राहकांना मिळते आहे. सवलत वाढविल्यास घर खरेदीदारांची पर्यायाने गृहकर्जधारकांची संख्या वाढून बांधकाम क्षेत्रालाही गती येणार आहे.

 अर्थव्यवस्थेत काहीसा मंदीचा अनुभव मागच्या वर्षी आलेला आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षी घरांच्या किमती कमी झाल्या तर काही ठिकाणी किमतीत स्थिरताही राहिली होती. एकूण नव्या प्रकल्पांच्या उभारणीचा विचार करता मागच्या वर्षी परवडणाऱया गृहप्रकल्पांचा वाटा 61 टक्के इतका होता.

2019 मध्ये घरांची महत्त्वाच्या शहरातील विक्री, नव्या प्रकल्पांची संख्या वाढली की घटली, स्थावर मालमत्तांचे सरासरी प्रति चौ. फू. दर कितपत राहिले याचा उहापोह आकडेवारीतून जाणुन घेऊया.

1 लाख 80 हजार घरे विक्रीविना शिल्लक

सरकारी आकडेवारीनुसार पाहता देशभरातील 1.8 लाख घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. या घरांची किंमत अंदाजे 1.39 लाख कोटी रुपये इतकी होते. या प्रकल्पातील 50 टक्के घरे ही दिल्ली-एनसीआर व मुंबई-एमएमआर भागातील आहेत.

बांधकाम क्षेत्राला सध्या वाइट परिस्थितीतून जावं लागतं आहे. या क्षेत्रातील विक्रीत मंदीची परिस्थिती जाणवत आहे. सरकारकडून अनेक सवलती दिल्या जात असल्या तरी अपेक्षीत गतीने बांधकाम क्षेत्राला विकास साधता येत नाही आहे. एकूण 1.8 लाख घरे विक्रीविना शिल्लक राहिली आहेत. या प्रकल्पातील घरांची किंमत 1.39 लाख कोटीच्या आसपास पोहचते. सध्याला 25 दशलक्ष चौ. फू. क्षेत्रफळात प्रकल्पांचे काम सुरू आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन भागात 51 हजार 721 घरे शिल्लक राहिली आहेत तर एनसीआर भागात 49 हजार 27 घरे विक्रीविना पडून राहिली आहेत.

विक्रीविना शिल्लक घरांची शहरानुसार आकडेवारी

एनसीआर- 49 हजार 27

मुंबई- 51 हजार 721

बेंगळूर- 20 हजार 474

चेन्नई- 8 हजार 725

पुणे- 11 हजार 813

हैदराबाद- 3 हजार 845

अहमदाबाद- 1 हजार 556

टायर टू शहरे- 1 लाख 83 हजार 582

Related posts: