|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार

ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार 

उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

वार्ताहर/ गणपतीपुळे

राज्य सरकारने 2012 साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय बदलून नव्या ग्रथालयांना मान्यता सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली.  मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

  या संमेलनाचे अध्यक्ष हेमचंद्र प्रधान, स्वागताध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदीं यावेळी उपस्थित होते. 2012 मध्ये एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱया या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

  कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे. या भूमीने अनेक भारतरत्न दिले अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य मी समजतो, असे यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले.  

 तीन दिवस चालणाऱया या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात उच्च शिक्षणातील संधी या विषयावर अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र झाले. सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक रेखा सिंघल यांचे काजू, आंबा, फणस यांची उपयोगिता या विषयावर व्याख्यान झाल्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन कार्यक्रम पार पडला. रविवार 19 जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल. सोमवारी अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे.

Related posts: