|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सीईटीपी अध्यक्षपदी सतीश वाघ

सीईटीपी अध्यक्षपदी सतीश वाघ 

प्रतिनिधी/ चिपळूण

=खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लोटे परशुराम पर्यावरण संरक्षण सहकारी संस्थेच्या (सीईटीपी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘सुप्रिया लाईफ सायन्स’चे अध्यक्ष आणि यशस्वी उद्योजक सतीश वाघ यांनी केवळ एका मताने  घरडा केमिकल्सचे डी. के. शेणॉय यांच्यावर विजय मिळवला. उपाध्यक्षपदी ‘विनती ऑरगॅनिक्स’च्या महादेव महिमान यांची बिनविरोध निवड झाली.

  निवडणूक निर्णय अधिकारी कुमार देवरूखकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उद्योजक वाघ व घरडा केमिकल्सचे डी. के. शेणॉय या दोघांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच माघार न घेतल्याने अखेर निवडणूक झाली. 11 पैकी 6 संचालकांची मते वाघ यांना मिळाल्याने एका मताने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.  दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी महिमान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

  डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. ज्यांचा 25 एमएलडी डिस्चार्ज आहे, अशाच उद्योगाच्या प्रतिनिधीला उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये सतीश वाघ, दिवाकर शेणॉय, आर. सी. कुलकर्णी, अनिल भोसले, महादेव महिमान, दीपक मोरे, अशोक शिंदे, शशिकांत पालेकर, दिनेश शर्मा, गौतम मखारिया या 10 जणांची तर ओबीसी गटातून बांदेकर या संचालकांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.  निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अखेरपर्यत प्रयत्न करण्यात आले. मात्र अध्यक्षपदासाठी एकमत न झाल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले.

  अलिकडच्या काळात शेणॉय यांनी सीईटीपीची धुरा सांभाळताना अनेक  अमूलाग्र बदल केले. नवे अध्यक्ष वाघ यांनीही यापूर्वी सीईटीपीची धुरा सांभाळलेली असून अनेक वर्षे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांच्या ‘केमेक्झील’ या शासनमान्य संस्थेचे गेली 22 वर्षे ते अध्यक्ष आहेत. लोटेसह रोहे औद्योगिक वसाहतीतील औद्योगिकीकरण आणि पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. सीईटीपी विस्तारीकरणासाठी 46 कोटीचा निधी शासनाकडून आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांच्या निवडीने आगामी काळात येथील औद्योगिकीकरणाला चालना मिळेल, अशी आशा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

 बिनविरोधासाठी आटोकाट प्रयत्न केले: वाघ

सीईटीपी अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये आपण अपयशी ठरलो. शेवटी नाईलाजाने निवडणूक घ्यावी लागली.  यापुढे लोटेच्या औद्योगिक विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू.  औद्योगिकीकरणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सर्वांच्या माध्यमातून केला जाईल

Related posts: