|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अमली पदार्थ तस्करीत देविंदरचा हात!

अमली पदार्थ तस्करीत देविंदरचा हात! 

पाकिस्तानी तस्करांशी होता संपर्क : आरोपीच्या प्रत्येक हालचालीवर होती नजर

वृत्तसंस्था/ श्रीनगर

 बडतर्फ पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग याच्या हालचालींवर काही दिवसांपासून नजर ठेवण्यासह त्याच्या फोनला ट्रक केले जात होते. देविंदर अनेक आठवडय़ांपासून संबंधित दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्याचे अमली पदार्थांच्या तस्करांशी संबंध होते, असा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी केला आहे. देविंदरने विनाअनुमती बांगलादेशचा दौरा केला होता असे उघड झाले आहे.

श्रीनगरच्या आलिशान वसाहतीतील त्याच्या घरी छापा टाकण्यात आला असता पाच ग्रेनेड आणि तीन एके-47 रायफल्स हस्तगत झाल्या आहेत. त्याच्या गुंतवणूक तसेच मालमत्तेचा तपशील उघड झाला आहे. त्याच्या नावावर असलेली मालमत्ता बेहिशेबी असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.

दहशतवाद्यांशी हातमिळवणी चूकच

देविंदरने अटकेनंतर अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलीस विभागात कार्यरत आणखी एक वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांसाठी काम करत असल्याचा आरोप देविंदरने केला आहे. दहशतवाद्यांना मदत करून मोठी चूक केल्याचे त्याने मान्य केले आहे.

अमली पदार्थांची तस्करी

देविंदरचे अमली पदार्थांच्या तस्करांशी मोठे कनेक्शन होते. देविंदर सिंग पुलवामाच्या त्रालचा रहिवासी आहे. याच भागाला हिजबुल मुजाहिदीनचा गड मानले जाते. दहशतवादी बुरहान वाणी आणि झाकिर मूसा याच भागातील रहिवासी होते. त्रालमध्ये देविंदरची वडिलोपार्जित मालमत्ता असून जम्मूमध्ये त्याचे एक घर आहे. सिंग याची मुलगी बांगलादेशात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तर मुलगा श्रीनगरमध्ये शिक्षण घेत आहे.

अन्य एका अधिकाऱयावर आरोप

दहशतवाद्यांना जम्मू येथे पोहोचविण्यासाठी देविंदरला 10 लाख रुपये देण्यात आले होते. आणखी एक वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांसोबत मिळून काम करत असल्याचा दावा देविंदरने चौकशीत केला आहे. देविंदरच्या दाव्याची पुष्टी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱयांनी म्हटले आहे.

शूर अधिकारी अशी ओळख

देविंदर पोलीस विभागातील कारकीर्दीच्या प्रारंभिक टप्प्यात शूर अधिकारी म्हणून  ओळखला जात होता. जोखिमयुक्त मोहिमांमध्ये सहभागी होण्यास तो कधीच टाळाटाळ करत नव्हता. 1990 च्या दशकात त्याला पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रूपमध्ये सामील करण्यात आले होते. सिंगने या पथकात दशकभर काम केले होते. या पथकातूनच त्याची निरीक्षक पदावर बढती झाली होती. देविंदरवर मधल्या काळात अनेक आरोपही झाले होते.

एनआयएकडे चौकशी

देविंदर सिंग प्रकरणी चौकशीसाठी एनआयएचे 5 सदस्यीय पथक रविवारी श्रीनगर येथे पोहोचले आहे. एनआयएचे पथक पुढील काही दिवसांमध्ये कुलगाम, काजीगुंड, श्रीनगर तसेच विमानतळांचा दौरा करून तेथे तपास करणार आहे. याचबरोबर देविंदरच्या विरोधात पुरावे गोळा केले जाणार आहेत. पुढील आठवडय़ात देविंदरला दिल्ली येथे आणले जाणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला तसेच संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील देविंदरच्या भूमिकेची चौकशी पेली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली
आहे.

Related posts: