|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » उद्धव ठाकरेंचा 7 मार्चला अयोध्या दौरा

उद्धव ठाकरेंचा 7 मार्चला अयोध्या दौरा 

शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्विटरवर माहिती

प्रतिनिधी/ मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्च रोजी अयोध्येच्या दौऱयावर जाणार आहेत. शिवसेनेचे मंत्री, खासदार देखील त्यांच्यासोबत असतील. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली. अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे शरयू नदीच्या तीरावर आरती सुद्धा करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी याआधीही अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर रामजन्मभूमी प्रकरणाचा निकालही लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसपूर्ती निमित्त ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. आता 7 मार्च ही तारीख संजय राऊत यांनी जाहीर केली आहे. या अयोध्या दौऱयाच्या वेळी देशभरातून हजारो शिवसैनिक येणार आहेत.

अयोध्येला राहुल गांधी यांना सोबत घेऊन जा, अशी टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. त्याचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी स्वागतच केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील अयोध्येला सोबत येण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत. अयोध्या यात्रा हा काही राजकीय प्रश्न नाही. जशी पंढरपूरची वारी असते तशीच ही वारी आहे. पंढरपूरच्या वारीत राजकारण, जात पात काहीच नसते तशा प्रकारचीच ही अयोध्येची वारी आहे.

शिवसेना आपल्या विचारांवर कायम

मनसेच्या नवीन हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. शिवसेना आपल्या विचारांवर कायम आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर राष्ट्रवादाचा विचार रूजविला. आता काही लोकांना नवीन पालवी फुटत असेल तर फुटू दे. बाळासाहेब आणि शिवसेना याचे लोकांना रोज स्मरण होते. हिंदुत्वाच्या विषयावर शिवसेनेला कोणी आव्हान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही संजय राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Related posts: