|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » फर्निचर बदलेल सजावटीचा रागरंग

फर्निचर बदलेल सजावटीचा रागरंग 

फर्निचर हा घराचा आत्मा असतो. या फर्निचरमुळेच घर भरल्यासारखे वाटत असते. बैठकीचा सोफा हा तर दिवाणखान्याकरीता महत्त्वाचाच. सोफा शक्यतो लाकडी घेण्यावर भर हवा. असे फर्निचर कायमस्वरूपी खरेदी करण्याऐवजी चार वर्षानंतर बदलता येईल, असं घेणे योग्य ठरते. फर्निचर बदलाने घराचा रागरंगही बदलेल.

फर्निचरशिवाय घराला पूर्णत्व येत नाही. म्हणून फर्निचरची निवड ही अतिशय काळजीपूर्वकपणे करण्याला प्राधान्य दिलं जातं. फर्निचर घेताना ते मजबुतीच्या बाबतीत उजवं असेल हे आधी पाहिलं जातं. त्याप्रमाणे फर्निचरची खरेदी केली जाते. यातही काहींना वर्षापुरतं वापरण्याइतपत दर्जाचं फर्निचर घ्यावंसं वाटतं. कारण त्यांना घरातलं फर्निचर दर दोन किंवा चार वर्षांनी बदलायचं असतं.

चांगल्या दर्जाचे फर्निचर घेतल्यास ते साधारणपणे 8 ते 10 वर्षे सहज टिकतं. पण आजकालची पिढी 4 वर्षानंतर बदलता येईल असं फर्निचर घेण्यावर अधिक भर देत आहे. पूर्वीच्या काळी लोकांची कमाईही आजच्या तुलनेने बेताचीच होती. त्यामुळे खरेदी करताना कोणतीही जास्त किमतीची वस्तु घेताना ती कायमचीच घरात राहणारी घेण्यावर भर असायचा. आता अलीकडच्या काही वर्षात मात्र या भूमिकेत बदल होताना दिसतो आहे. कारण फर्निचरच घराचे फोकल पॉइंट असल्याने ते कायम ठेवण्याचा विचार मागे पडतो आहे. अर्थात असा विचार सारेच करत आहेत असं ठामपणे म्हणता येणार नाही.

फर्निचर निवडीत एक बाब अतिशय महत्त्वाची असते ती म्हणजे कोणतंही फर्निचर हे आरामदायी असायला हवं. एकदा फर्निचर घेतल्यानंतर काही वर्षाचा कालावधी गेल्यानंतर त्याच्या दर्जावर परिणाम व्हायला सुरूवात होते. शिवाय त्याची चमकही हळूहळू फिकी पडू लागते. मग त्यावर पॉलिश करावे लागते. बैठकीसाठीचं फर्निचर घेताना फर्निचर आरामदायी असण्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. आजच्या युगातले फर्निचर आरामदायीपणा देणारे असतेच पण दुसरीकडे आधुनिक तंत्राचा सुरेख वापर करत  वैविध्यपूर्ण नाविन्य त्यात आणलं जात आहे. बाजारातील उपलब्ध फर्निचरची व्हरायटी पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. अर्थातच स्पर्धा आज प्रत्येक क्षेत्रात डोकावते आहे. नव्या कल्पक विचारांच्या माध्यमातून आजचे फर्निचर अधिक उत्तमपणे घडवले जात आहे. रचनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना दिसते आहे. मानवी शरीर आणि आरोग्यासंबंधीची जोखीम लक्षात घेऊन तसे उपयुक्त फर्निचर बनवण्याचा ट्रेंड आज बाजारात दिसून येतो. गॅजेट बदलायचे झाल्यास आपण पटकन निर्णय घेतो. तसा निर्णय आता फर्निचर घेतानाही घ्यायला हवा. आरोग्याची काळजी राखत आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेलं फर्निचर घेण्याला प्राधान्य द्यायला हवं. लिव्हिंगरूममध्ये असणाऱया गोष्टी या आजच्या ट्रेंडशी मिळत्या जुळत्या असायला हव्यात. त्यावर आपला जोर हवा. मग फर्निचर किंवा या खोलीचा मुख्य केंद्रबिंदू असणारा सोफाही आजच्या आधुनिकतेला शोभणारा हवा. म्हणूनच काही वर्षानंतर नवा सोफा घेण्याचा पर्याय हा उत्तम ठरतो. नवे फर्निचर घेतल्याने घराचा एकंदर लुकच बदलतो. याने एक प्रकारची प्रसन्नता लाभते.

नवे फर्निचर खरेदी करायचे म्हणजे त्यासाठी पुन्हा खर्च आलाच. फर्निचरची किमत जास्त असल्याने त्यासाठी पैशाची तरतूद करावी लागते. सामान्यांना मात्र असे फर्निचर बदलणे बऱयाचदा जड जाते. पण ज्यांना परवडतं ते फर्निचर बदलून घेऊ शकतात. जुनं फर्निचर खराब झालेलं असल्यास ते दुरूस्त करायला वेळ आणि पैसा दोन्हीही जास्त खर्च होत असतो. तेव्हा अशावेळी नवं फर्निचर तेही आपल्या बजेटमध्ये घेण्याची संधी असते. आपल्याला पैशाच्या दृष्टीने शक्य झाल्यास हा पर्याय स्वीकारण्याची तयारी करायला हरकत नाही.

Related posts: