|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ला काजूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त ‘विटॅमीन सी’

वेंगुर्ला काजूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त ‘विटॅमीन सी’ 

देवगडमधील बौद्धिक संपदा कार्यशाळेत प्रा. ऍड. गणेश हिंगमिरे यांची माहिती

प्रतिनिधी / देवगड:

कोकणातील सुमारे 25 उत्पादनांना ‘जीआय’ नामांकन मिळू शकते. मात्र अद्याप केवळ पाच उत्पादनांना जीआय नामांकन मिळाले आहे. शेतकऱयांची मानसिकता बदलल्यास व कोकणातील उत्पादकांना जीआय नामांकन मिळाल्यास कोकणातील तरुणांना नोकऱया शोधण्याची गरज भासणार नाही. तसेच मुंबईकडे नोकऱयांसाठी गेलेला तरुणांचा लेंढाही कोकणकडे वळू शकतो. वेंगुर्ला काजूसाठी जीआय नामांकन मिळाले आहे. वेंगुर्ला काजूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त ‘विटॅमीन सी’ जीवनसत्व आहे. याचे मार्केटिंग योग्य झाल्यास वेंगुर्ल्याच्या काजूला जगात मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असे मत आशियातील प्रख्यात ‘जी. आय.’ अभ्यासक प्रा. ऍड. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केले.

येथील स. ह. केळकर महाविद्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बौद्धिक संपदा कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली, कार्यवाह दादा पारकर, संचालक एकनाथ तेली, व्ही. सी. खडपकर, तुकाराम तेली आदी उपस्थित होते. ऍड. हिंगमिरे म्हणाले, जी. आय. म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. जी आपली ‘आय’ (आई) आहे तो ‘जीआय’ अशी व्याख्या सांगताना आपली आई म्हणजे आपली माती. ज्या आपल्या मातीतील गुणधर्मांमुळे व आपल्या पूर्वजांनी जी उत्पादनाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करून दिली आहे, ती संपत्ती जीआय आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या जमिनीत काय लागवड होऊ शकते, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे 150 ते 200 वर्षांपूर्वी काजू, आंबा, कोकम, फणस यांची लागवड केली आहे. जीआय नामांकनाचे फायदे काय, हे पटवून देताना त्याचे योग्य मार्केटिंग कसे केले जावे, याची माहिती ऍड. हिंगमिरे यांनी दिली.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये 20 टक्के जास्त न्यूट्रेशियन

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये इतर ठिकाणी पिकणाऱया स्ट्रॉबेरीपेक्षा 20 टक्के जास्त न्यूट्रेशियन आहे. इतर स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 150 ते 160 बिया असतात, तर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 200 बिया असतात. त्यामुळे आरोग्यासाठी सर्वात महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चांगली आहे. अशाप्रकारे मार्केटिंग झाल्याने तसेच स्ट्रॉबेरी महोत्सव भरविला जात असल्याने त्याचा फायदा महाबळेश्वरला झाला आहे. तसेच नाशिकच्या द्राक्षांचे आहे. गोदावरी नदीच्या पाण्यामुळे नैसर्गिकदृष्टय़ा या द्राक्षांच्या चवीमध्ये फरक जाणवतो. नाशिकची दाक्षे चवीला गोड असूनही मधुमेहांसाठी त्रासदायक नाहीत. त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. तसेच कोकम, काजू, आंबा व फणस हे कोकणातील महत्त्वाची उत्पादने आहेत. येथे निर्माण होणारा आंबा, काजू, फणस व कोकम यांची चव अन्य कुठेही नाही. यातील कोकम, काजू व आंबा याला जीआय घेण्यात आले आहे. फणसालाही जीआय घेण्यात आले आहे. मात्र या सर्व उत्पादनांचे योग्य मार्केटिंग झालेले नाही. हापूस आंब्यामध्ये अनेक असे घटक आहेत की, त्याचे मार्केटिंग होत नाही. त्यामुळे आफ्रिकेतील ‘मालवी’सारखा हापूस आंबा येथे शिरकाव करू शकला आहे. मालवीतील आंबा हा रत्नागिरीतील आंबा कलम नेऊन उत्पादन घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात याची व्याप्ती वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी जागरुक राहिले पाहिजे.

जर्मनी देशामध्ये जीआयचे अधिक पेटंट

सर्वात जास्त जर्मनी देशाने जीआयचे पेटंट घेतले आहेत. सुमारे 16 हजार पेटंट जर्मनीने घेतले आहेत. त्यामुळे तेथील तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे. कोकणातही जीआय पेटंट मिळाले आहेत. त्याचा फायदा तरुणांनी करून घ्यायला हवा. आंबा, काजू, फणस व कोकम या उत्पादनातून विविध फळप्रक्रिया उद्योग उभारले गेले पाहिजेत. तत्पूर्वीचे त्याचे चांगले मार्केटिंग होणे आवश्यक आहे. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग होण्यासाठी शेतकऱयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

देवगड महाविद्यालयाने काजू, कोकम व आंबा या फळांचे मार्केटिंग करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी आपण महाविद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे हिंगमिरे यांनी सांगितले.

Related posts: