|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली जिल्हय़ाला 528कोटी कर्जमाफ होणार

सांगली जिल्हय़ाला 528कोटी कर्जमाफ होणार 

प्रतिनिधी / सांगली

 महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्हय़ाची 528 कोटींची कर्जमाफी होणार आहे. तर 62 सहकारी सोसायटय़ांचे संचालक आणि 25 हजारांपेक्षा जास्त पगार असणारे कर्मचारी यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. येत्या 21 फेब्रुवारीपासून गावचावडीवर कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱयांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर महाईसेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल आदी ठिकाणी बायोमेट्रिक पध्दतीने आधार लिंकव्दारे निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाअधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठक दिली. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यावेळी उपस्थित होते.

 कर्जमुक्ती अभियानात यापूर्वी 8366 शेतकऱयांचे आधार लिंकच नव्हते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या अभियानात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 176 आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 278 असे 454 शेतकरी आधार लिंक झालेले नाहीत. काहींनी आधार कार्डच काढण्यात आलेले नाही. आधार लिंक नसणाऱया शेतकऱयांची संख्या अल्प राहिली आहे. एक फेब्रुवारीपासून कर्जमाफी याद्या ऑनलाईन अपलोड करण्यास सुरवात झाली. 89958 कर्जदार शेतकरी होते. त्यापैकी 86121 कर्जदारांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत. केवळ 3837 कर्जदार आधार कार्डातील चुकीमुळे अद्याप अपलोड करण्यात आलेले नाहीत. बुधवारी सायंकाळपर्यंत त्रुटी निवारण करून शंभर टक्के कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर अपलोड होतील. यामध्ये काही शेतकऱयांनी दोन किंवा तीन बँकांमध्ये खाती असल्याने भितीमुळे आधार कार्ड दिलेली नाहीत. पण, कितीही बँकामध्ये खाती असली तरी शेतकऱयांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणारच आहे. शेतकऱयांनी गोंधळून न जाता आधार कार्ड लिंक करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे.

 जिल्हय़ाला या कर्जमाफीतून 528 कोटी रूपयांचा लाभ होणार आहे. ही रक्कम आणखी कमी होईल. पण वाढण्याची शक्यता नाही. असे सांगून जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सहकारी दूध संघ, कृषि उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाने अशा 62 सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि संचालकांना कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे. तर सहकारी संस्थामधील 25 हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱया कर्मचाऱयांनाही कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे. ही संख्या 3369 आहे. येत्या 21 फेब्रुवारीपासून कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱयांच्या याद्या ऑनलाईन तसेच गावपातळीवर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर शेतकऱयांनी नजीकच्या महाईसेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र आदी ठिकाणी बायोमेट्रीक पध्दतीने आधार लिंक करून कर्जमाफीस मान्यता देण्याची आहे.

  यादीत नाव नसले तरी अडचण नाही

  कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी शेतकऱयांनी घाबरण्याचे कारण नाही. ज्या शेतकऱयांना आपण कर्जमाफीसाठी पात्र ठरतो असे वाटते त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावा. शासनाकडे ऑनलाईन माहिती कळवून पात्र शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाअधिकारी चौधरी यांनी दिली.

Related posts: