|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » भारत दौऱयासंबंधी अत्यंत उत्सुक!

भारत दौऱयासंबंधी अत्यंत उत्सुक! 

अमेरिकेच्या अध्यक्षांनी काढले उद्गार : ‘केम छो ट्रम्प’चे आयोजन

 विशेष अतिथीचे स्वागत संस्मरणीय ठरणार असल्याचे मोदींचे विधान

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दांडिया खेळताना दिसून येण्याची शक्यता आहे. ट्रम्प हे 24-25 फेब्रुवारी या कालावधीत भारताच्या दौऱयावर असतील. या दौऱयात अहमदाबादमध्ये ‘केम छो ट्रम्प’च्या व्यासपीठावर त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. चालू महिन्यात होणाऱया भारत दौऱयासंबंधी अत्यंत उत्सुक असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. भारत स्वतःच्या विशेष अतिथीचे संस्मरणीय स्वागत करणार असल्याची प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या भारत दौऱयावरून आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यांचा हा दौरा अत्यंत विशेष असून यातून भारत-अमेरिकेची मैत्री अधिकच दृढ होणार आहे. विविध मुद्दय़ांवर भारत अमेरिकेला सहकार्य करत आहे. दोन्ही देशांमधील बळकट होणाऱया मैत्रीमुळे जगाला लाभ होणार असल्याचे मोदींनी ट्विट करत म्हटले आहे.

मोदी चांगले मित्र

उत्तम संबंधांच्या अपेक्षेसह भारतात जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र असून एक उत्तम व्यक्ती देखील आहेत, असे ट्रम्प यांनी बुधवारी नमूद केले आहे. ट्रम्प यांचा अध्यक्ष म्हणून भारताचा हा पहिलाच दौरा आहे. 2010 आणि 2015 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी दौरा केला होता.

व्यापार करार

भारतात पोहोचल्यावर विमानतळापासून क्रिकेट स्टेडियपर्यंत लाखो लोक स्वागतासाठी हजर असतील, अशी माहिती मोदींनी दिली आहे. हॅम्पशायर येथील सभेत 50 हजार जण उपस्थित राहिल्यास मोठे कौतुक वाटते. पण भारतात 50 ते 70 लाख लोक विमानतळापासून नव्या स्टेडियमपर्यंत स्वागतासाठी उभे असणार आहेत. अहमदाबाद येथील स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. आगामी दौऱयात भारतासोबत प्रभावी व्यापार करार केला जाणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

कडेकोट बंदोबस्त

ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱयाच्या पार्श्वभूमीवर सरदार पटेल मोतेरा क्रिकेट स्टेडियमची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 300 पोलीस आणि अधिकाऱयांसह एनएसजी आणि एसपीजी जवान तैनात राहणार आहेत. एसपीजी महासंचालक राजीव रंजन भगत यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पुढील  दोन ते तीन दिवसांत अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी अहमदाबाद येथे पोहोचणार आहेत. चालू आठवडय़ातच भक्कम सुरक्षेची योजना आखण्यात
येईल.

13 किलोमीटर अंतराचा रोड शो

ट्रम्प आणि मोदींचा अहमदाबाद शहरात 13 किलोमीटर अंतराचा रोड शो आयोजित होणार आहे. विमानतळावरून दोन्ही नेते सर्वप्रथम गांधी आश्रम येथे पोहोचतील. रोड शोशी संबंधित मार्गाचे नूतनीकरण केले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहराच्या विविध हॉटेल्समध्ये वास्तव्य करणाऱया विदेशी लोकांची तपासणी केली जात आहे. तर मोतेरा, साबरमती आणि चांदखेडा येथे भाडेतत्वावर राहणाऱया लोकांचा मागील 5 वर्षांचा तपशील पडताळून पाहिला जात
आहे.

मेलानियांना मिळणार अनेक भेटवस्तू

ट्रम्प यांच्या या दौऱयादरम्यान त्यांच्या पत्नी मेलानिया यांना गुजरात सरकारकडून संस्कृती आणि कलाकुसर दर्शविणाऱया भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. यात पाटणची पटोदा, जामनगरमधील विशेष स्कार्फ तसेच कच्छी भरतकाम असलेला रुमाल प्रदान केला जाणार आहे. याचप्रकारे ट्रम्प यांना भरतकाम केलेले जॅकेट तसेच पोशाख देण्यात येणार आहे. सोने आणि हस्तिदंताने निर्माण करण्यात आलेले एक बास्केट आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृतीही प्रदान करण्यात येईल.

Related posts: