|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पुलवामा आत्मघाती हल्ल्याची वर्षपूर्ती

पुलवामा आत्मघाती हल्ल्याची वर्षपूर्ती 

गुरुवार, 14 फेब्रुवारी, 2019 रोजी दुपारी 3.30 वाजता सीआरपीएफच्या  78 बसेसमधून सुमारे 2500 जवानांना श्रीनगर येथे नेण्यात येत होते. नेहमीप्रमाणे त्यावेळीही महामार्गावरील अन्य वाहनांना न रोखता हा ताफा पुढे सरकत होता. बसेसमधील अनेक जवान सुटीनिमित्त स्वतःच्या घरी जात होते. त्यांच्या चेहऱयावर आप्तस्वकीयांना भेटण्यापूर्वीचा आनंद होता. याच महामार्गावर दोन दिवसांपूर्वीही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. या कारणामुळे प्रत्येकजण दक्ष होता.

पण एका कारने महामार्गाच्या दुसऱया बाजूने येत ताफ्यातील बसला धडक दिली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला होता. बसमधील जवानांच्या मृतदेहाचे तुकडे अनेक मीटर अंतरापर्यंत पसरले होते. नेमके काय घडले हे जवानांना समजण्यापूवच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सीआरपीएफ जवानांनीही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. पण तेथून पलायन करण्यास दहशतवाद्यांना यश मिळाले होते.

स्फोटानंतर निर्माण झालेला धूर हटताच तसेच गोळीबार थांबताच तेथील दृश्य हृदयद्रावक होते. सर्वत्र मांसाचे तुकडे आणि रक्ताचा सडा पसरला होता. जवान स्वतःच्या सहकाऱयाचा शोध घेत होते. काही वेळातच या हल्ल्याचे वृत्त देशभरात आगीप्रमाणे फैलावले. प्रत्येकजण या हल्ल्यामुळे संतप्त झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते.

1989 नंतरचा सर्वात मोठा हल्ला

1989 नंतरच्या काळात जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्याने पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. स्फोटकांनी भरलेली कार बसला धडकविणाऱया दहशतवाद्याची ओळख आदिल अहमद डारच्या स्वरुपात समोर आली. आदिलला पोलिसांनी सुमारे 6 वेळा विविध प्रकरणी अटक केली होती, पण प्रत्येकवेळा त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले होते.

कामरानने रचला कट

पुलवामा हल्ल्यानंतर सैन्याने संबंधित परिसराला चहुबाजूने घेरून शोधमोहीम राबविली होती. पुलवामा हल्ल्याचा कट रचणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरानला 18 फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते.

पाकचा दुष्प्रचार

भारतात संतापाचे वातावरण असताना शासनाच्या उच्च स्तरावर या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी खलबतं सुरू होती. तर हल्ल्याच्या 5 दिवसांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचे अप्रत्यक्ष स्वरुपात समर्थन केले होते. यावर भारतीय सैन्याने ‘पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर अवश्य देणार, पण त्यासाठीचा दिवस आणि वेळ आम्ही निश्चित करू’ असे सांगण्यात आले.

बालाकोट एअरस्ट्राईक

पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसांनी म्हणजेच 26 फेब्रुवारीची सुरुवात पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी केलेल्या एअरस्ट्राईकच्या वृत्ताने झाली होती. नेमके काय घडले हे प्रत्येकजण जाणू इच्छित होता. याचे उत्तर तिन्ही संरक्षण दलांच्या पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आले. मिराज 2000 या लढाऊ विमानांनी बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला करत 200-300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पण पाकिस्तानने हल्ल्याचे वृत्त अद्याप स्वीकारलेले नाही. एअर स्ट्राईक प्रकरणी अनेक देशांनी भारताचे उघड समर्थन केले होते.

 

 

 

 

 

Related posts: