|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गांधी मार्केटातील विक्रेत्यांचा मडगाव पालिकेवर मोर्चा

गांधी मार्केटातील विक्रेत्यांचा मडगाव पालिकेवर मोर्चा 

प्रतिनिधी / मडगाव :

पिंपळकट्टय़ासमोरील रस्त्यावर ठाण मांडून घाऊक फळविक्री करणाऱया विक्रेत्यांना सकाळी 7 नंतर व्यवसाय करू देण्यास गांधी मार्केट फळ-भाजी आणि तयार कपडेविक्रेते संघटनेने पुन्हा आक्षेप घेतला आहे. गुरुवारी दुपारी मडगाव पालिकेवर गांधी मार्केटमधील विक्रेत्यांनी मोर्चा नेऊन मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांच्यासमोर आपला आक्षेप मांडला.

संघटनेचे अध्यक्ष असलेले माजी नगराध्यक्ष राजेद्र आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी अश्रफ पंडियाल, अस्लम शेख, गुरुदास बोरकर, फजलू रेहमान, हुसेन कल्लोळी, मोयनू तहसिलदार व अन्य पदाधिकारी तसेच विक्रेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पंधरवडय़ापूर्वी मुख्याधिकाऱयांशी चर्चा झाली असता त्यांनी सकाळी 7 नंतर सदर घाऊक विक्रेत्यांना हटविणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही दिवस कारवाई झाली. मात्र मागील दोन-तीन दिवसांत 9 ते 9.30 पर्यंत हा बाजार रस्त्यावरून हलत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रहदारीची कोंडी होत आहे व गांधी मार्केटातील व्यापाऱयांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, असा दावा आजगावकर यांनी याप्रसंगी केला.

तोडगा काढण्याचे आश्वासन

यावेळी मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी स्वतः आकस्मिक भेट देऊन यावर तोडगा काढण्याचे तसेच मार्केट निरीक्षकांना आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन विक्रेत्यांना दिले. यावेळी मार्केट निरीक्षकांच्या कार्यपद्धतीबद्दलही विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली व आदेश नसल्याची सबब पुढे करून हे निरीक्षक कारवाई करत नाहीत, अशी कैफियत मुख्याधिकाऱयांसमोर मांडली.

अनेक बेकायदा हातगाडे

मडगाव पालिका क्षेत्रात 34 हातगाडय़ांना व्यवसाय करण्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. त्यातील 32 हातगाडे गांधी मार्केटमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळे फक्त दोन हातगाडे रस्त्यावर आढळणे आवश्यक होते. मात्र शेकडो बेकायदा हातगाडे व्यवसाय करताना दिसतात, असे फजलू रेहमान यांनी मुख्याधिकाऱयांच्या नजरेस आणून दिले.

पिंपळकट्टय़ासमोरील रस्त्यावर घाऊक फळविक्री करणाऱयांना सकाळी 7 नंतर मडगाव पालिकेकडून मज्जाव करण्यात येत असल्याने या विक्रेत्यांनी मंगळवारी सकाळी पालिकेवर मोर्चा नेऊन सदर मुदत सकाळी 8 पर्यंत वाढवावी, अशी मागणी मुख्याधिकाऱयांकडे उचलून धरली होती. पालिकेचे मार्केट निरीक्षक व अन्य संबंधितांशी चर्चा करून वरील मागणीवर विचार केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. मात्र मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी आपली मागणी मान्य केली असून सकाळी 8 पर्यंत फळविक्री करण्यास परवानगी दिली आहे, असा दावा मोर्चा आणलेल्या घाऊक फळविक्रेत्यांनी केला होता.

Related posts: