|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जोतिबाच्या खेटय़ांना उद्यापासून प्रारंभ

जोतिबाच्या खेटय़ांना उद्यापासून प्रारंभ 

वार्ताहर / जोतिबा डोंगर

      दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या खेटय़ांना रविवार 16 फेब्रुवारी पासून पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होणार आहे. यासाठी परिसर सज्ज झाला आहे. पाच रविवारी होणारे खेटे महत्त्वपूर्ण व मानाचे मानले जातात. खास करून ‘कोल्हापूरकरांचे’ खेटे म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेटय़ांसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.

       माघ महिन्यात पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱया यात्रेस ‘जोतिबाचे खेटे’ असे म्हणतात. कोल्हापुरातील काही भाविक पायी चालत खेटे घालतात. पूर्वी केदारनाथ (श्री जोतिबा) दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले असल्याचे करवीरनिवासिनी महालक्ष्मीस कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी आली व केदारनाथांना न जाण्याविषयी विनवले. तेव्हा नाथांनी वाडीरत्नागिरीवर (जोतिबा डोंगर) राहण्याचे मान्य केले, तेव्हापासून पायी चालत खेटे घालण्याची प्रथा सुरू झाल्याची आख्यायिका आहे.

      जोतिबा डोंगरावरील प्रमुख यात्रांपैकी खेटय़ांच्या रविवारची यात्रा आहे. श्री जोतिबाचे पाच खेटे केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. हि खेटय़ांची यात्रा कोल्हापूरकरांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. रात्री दोन वाजल्यापासून भाविक जोतिबाच्या डोंगर पठारावरून वाट काढत डोंगरावर दाखल होत असतात. परंतू काही भाविक मंदिर परिसरात हुल्लडबाजी करत असतात व त्यामुळे वातावरण तंग होत असते. तेव्हा भाविकांनी असा अनुचित प्रकार न करता मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस विभाग, देवस्थान समिती व पुजारी उत्कर्ष समितीने केले आहे.

       दरम्यान रविवारी पहाटे घंटानाद करून ‘श्रीं’ची काकड आरती व पाद्यपूजा करण्यात येईल. सकाळी ‘श्रीं’सह नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, दत्त व रामलिंग या देवांना महाभिषेक व अलंकार घालून महापूजा बांधण्यात येईल. त्यानंतर धार्मिक विधी करुन महानैवेद्य दाखवण्यात येईल. त्यानंतर धुपारती सोहळा होईल. रात्री 8 वाजता पालखी सोहळा धार्मिक विधीने होईल.

Related posts: