|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तीनशे मालमत्ताधारक चौकात झळकणार

तीनशे मालमत्ताधारक चौकात झळकणार 

प्रतिनिधी / सांगली

घरपट्टी थकविणाऱयांच्यावर मालमत्ता विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी घरपट्टी थकविणाऱया तीन मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. दरम्यान, एक लाखापेक्षा जास्त घरपट्टी थकीत असणाऱया मालमत्ता धारकांचे फोटो दोन दिवसात शहरातील चौकाचौकात डिजिटलवर झळकवण्यात येणार असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी दिली. मालमत्ता विभागाच्या या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

मार्च एण्डजवळ आल्याने घरपट्टी विभागाने वसुलीसाठी धडक मोहीम सुरु केली आहे. चालू व थकबाकी मिळून मार्च 2020 अखेर 76 कोटी 84 लाख रूपयांच्या वसुलीचे उदिष्ट आहे. मार्च अखेर यापैकी किमान 50 कोटी रूपये वसुल करण्याचे उद्दिष्ट आयुक्त नितीन कापडणीस यांनी घरपट्टी विभागाला दिले आहे. दरम्यान आजअखेर 30 कोटी 67 लाख रूपये वसुल झाले आहेत. मार्चअखेर पर्यंत उर्वरीत 20 कोटीसह उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली करण्याचे नियोजन मालमत्ता विभागाने केले आहे. त्यासाठी मनपा क्षेत्रात विशेष वसुली मोहीम सुरु केली आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना कर संकलक शिंदे म्हणाले, घरपट्टी थकविलेल्या  15 हजार मालमत्ताधारकांना जप्ती पूर्व नोटीसा बजावण्यात आल्या आहे. यातील एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या तीनशे मालमत्ता धारकांची माहिती फोटोसह चौका चौकात डिजिटलवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. यात सांगली, मिरज व कुपवाड शहरातील प्रत्येकी शंभर थकबाकीदारांचा समावेश आहे. त्यांच मालमत्ता जप्तीचे वॉरंट तयार आहे. थकबाकी भरण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. फोटो झळकल्यानंतर होणारी बदनामी टाळण्यासाठी थकबाकीदार मालमत्ताधारकांनी तातडीने थकबाकी भरावी, असे अवाहन शिंदे यांनी केले आहे.

तीन मालमत्ता जप्त

गोपाळ कुलकर्णी 36 हजार, राजेश उंडाळे 39 हजार तर अभय पाठक यांच्याकडे 1 लाख 2 हजार रूपयांची थकबाकी गेल्या 18 ते 20 वर्षापासून आहे. या तीनही जणांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वारंट अधिकारी सुनील पाटील यांच्यासह बाळासाहेब मल्लेवाडे, सुरेश चोरमोले, अंकुश जिमगे यांनी ही कारवाई केली. आणखीन 450 जप्ती वारंट येत्या चार दिवसात बजावण्यात येणार आहेत.

नितीन शिंदे, कर निर्धारक व संकलक.

Related posts: