|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मणेराजुरी येथे वाहनाच्या धडकेत महिला ठार

मणेराजुरी येथे वाहनाच्या धडकेत महिला ठार 

वार्ताहर / मणेराजुरी 

मणेराजुरीत भरधाव वाहनाने महिलेला चिरडले. यामध्ये प्रभावती दत्तात्रय पाटील (वय 55) या जागीच ठार झाल्या. प्रभावती यांना धडकून जाणारे अज्ञात वाहन न थांबल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.

 बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर हॉटेल कंदुरीजवळ ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, शरीरावरून वाहनाची चाके गेल्यामुळे घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. तासगाव-कवठेमहांकाळ राज्य मार्गावर पुन्हा अपघात झाला आहे. नवीन झालेला हायवे की ‘मृत्यू मार्ग’ अशी परिसरात चर्चा आहे.

 घटनास्थळ व पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तासगाव येथील वरचे गल्लीमध्ये प्रभावती दत्तात्रय पाटील या गुरुवारी सांगोला येथील नातेवाईकाचे रक्षाविसर्जन विधी आटोपून माहेरी मणेराजुरी येथील सुधाकर पवार (गुजर मळा) या आपल्या भावाच्या घरी मुक्कामी आल्या होत्या. शुकवारी सकाळी सर्व नातेवाईकांना भेटून त्या गुजर मळा येथून चालत मणेराजुरी बसस्थानकाकडे येत असताना अचानक स्टॅडकडून येणाऱया भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार ठोकर दिली.  यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वाहनाची चाके त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांना वाचण्याची संधी मिळालीच नाही. त्यातच ठोकरुन जाणारे अज्ञात वाहन न  थांबल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. या महिलेला चिरडून जाणारा मुरुमाचा डंपर असल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्यामुळे अपघात करणारे वाहन कोणते व ते कोणीच कसे पाहिले नाही याबाबत घटनास्थळी संभ्रम होता. या परिसरातील सीसीटीव्ही तपासणीनंतर या अज्ञात वाहनाचा शोध लागण्याची शक्यता आहे. घटनास्थळी जि.प. सदस्य सतीश पवार, खंडू पवार, दामू पवार यांनी धाव घेऊन नातेवाईकांना धीर दिला. पोलीस पाटील दिपक तेली यांनी या घटनेची माहिती तासगांव पोलिसांना दिली. पंचनामा करून शवविच्छेदनानंतर तासगावमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत.

तासगाव-मणेराजुरी-कवठेमहांकाळ राज्य मार्गावर रस्त्यावर सतत अपघात होत असताना व वाहने वेगात जात असताना गावातील बस्थानक चौकातील सीसीटीव्ही बंद आहेत. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर पट्टे नाहीत. मुरमाची बेकायदेशीर वाहतूक करणारे डंपरच्या वेग मर्यादेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

Related posts: