|Saturday, March 28, 2020
You are here: Home » संवाद » दशकपूर्ती एका वाचन चळवळीची

दशकपूर्ती एका वाचन चळवळीची 

‘वाचाल तर वाचाल’ ही संकल्पना रूजविण्यासाठी कृतीशील पाऊल उचलण्याचा वसा लोकमान्य ग्रंथालयाने दहा वर्षांपूर्वी घेतला. वाचनसंस्कृती लोप पावत असल्याच्या पर्वामध्ये एक दीपस्तंभ बनून लोकमान्य ग्रंथालय कार्यरत झाले. फक्त वाचन संस्कारच नव्हे तर साहित्यविषयक विविध उपक्रम, व्याख्यानमाला आणि साहित्यिकांशी सुसंवादाची एक चळवळच या माध्यमातून उभी राहिली. बेळगावच्या साहित्य संस्कृती-परंपरेचा ठेवा बनलेल्या या ग्रंथालयाच्या दशकपूर्तीच्या टप्प्यावर मागे वळून पाहण्यासाठी घेतलेला हा आढावा…

ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृती रक्षणाचा विचार प्रसारित व्हावा, सीमाभागात मराठीचा जागर व्हावा, ही सदिच्छा मनात ठेवून किरण ठाकुर यांनी गंथालय सुरु करावे, असा ध्यास धरला आणि त्यातूनच ‘लोकमान्य गंथालयाची’ निर्मिती झाली.

शनिवार दि. 27 फेब्रुवारी 2010 रोजी कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते लोकमान्य ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. दिवस मिळाला तोही ‘मराठी भाषा दिनाचा’. मराठी भाषा दिनादिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथालयाची सुरुवात झाली.

लोकमान्य गंथालयाची सुरुवात केवळ 111 पुस्तकांपासून झाली आणि 10 वर्षे पूर्ण करताना ती संख्या मराठी 15000 व इंग्रजी 10000 अशी दोन्ही मिळून 25000 पर्यंत पोहोचली आहे. गंथालयाच्या उद्घाटनादिवशी सभासद संख्या 50 होती. आणि आम्हाला लाभलेला सभासद हा जाणकार वाचक होता. दिवसेंदिवस ही संख्या वृद्धींगत होत गेली.

ग्रंथालयासाठी आम्हाला जी वास्तु मिळाली, तीही अतिशय देखणी, हवेशीर व प्रशस्त. येणारी प्रत्येक व्यक्ती साहजिकच तिच्या प्रेमात पडायची. मान्यवर मंडळी, देखणी इमारत, 111 पुस्तके या सगळय़ा दिमाखात गंथालयाची सुरुवात झाली. गंथालय हे केवळ पुस्तक देवघेव करणारे गंथालय न राहता गंथालयामार्फत निरनिराळे उपक्रम राबवून ‘वाचनसंस्कृती’  वृद्धींगत करावी, हा मूळ उद्देश आहे. याची सुरुवात दुसरे दिवशी म्हणजेच ‘मंगेश तेंडुलकरांशी गप्पाटप्पा’ या कार्यक्रमाने झाली. त्यानंतर आम्ही लहान मुलांसाठी मे महिन्यात बालवाचक मेळा भरविला. मेळाव्यास आलेल्या बालसभासदांची उपस्थिती पाहून आम्ही लहान मुलांकरीता बालविभाग सुरु केला, केवळ महिना 10 रुपये वर्गणी घेऊन. यालाही आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीलाच 250 मुले मुली आमची सभासद झाली.

 

घरपोच पुस्तक योजना

लोकमान्य गंथालयास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. सभासद व पुस्तके यामध्ये दिवसेंदिवस भर पडत होती. आणि काही मान्यवर मंडळींकडून देणगीदाखल पुस्तके गंथालयाच्या पुस्तकांमध्ये मोलाची भर टाकत होते. गंथालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, 8 ऑगस्ट 2010 रोजी मधु मंगेश कर्णिक, जी. ए. कुलकर्णी स्मृतिदालनाचे उद्घाटन करुन. या स्मृतीदालनामुळे गंथालयाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचले. महाराष्ट्रातून येणाऱया प्रत्येक साहित्यिकाला व जी. ए. प्रेमींना लोकमान्य गंथालय हे एक महत्वाचे केंद्र बनले.

लोकमान्य गंथालयास भेट देणाऱया महान व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत होती. आणि गंथालय दिवसेंदिवस निरनिराळे उपक्रम राबवून वाचक व गंथालय यांच्यातील दरी कमी करण्याच्या प्रयत्नात असतानाच ‘वाचक आपल्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ असेल तर आपण त्यांच्यापर्यंत पोहचू’ हा उद्देश मनात घेऊन 2 ऑक्टोबर 2010 रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ‘घरपोच पुस्तक योजने’चा आरंभ करण्यात आला. यानंतर दिवाळीनिमित्त सभासदांसाठी उत्तमोत्तम दिवाळी अंकाची पर्वणी देण्यात आली. 250 रुपयांत 100 हून अधिक अंक वाचकांसाठी उपलब्ध करुन दिले. या योजनेला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बाल वाचकांकरिता बेळगाव जिल्हय़ातील विविध शाळांमध्ये 25000 साधना बालकुमार दिवाळी अंकाचे वितरण करण्यात आले.

लोकमान्य ग्रंथालयास पुस्तक प्रकाशन करण्याचा पहिला मान मिळवून दिला कै. दौलत मुतकेकर यांच्या ‘रंगयात्री’ या पुस्तकाने. अशा विविधांगाने ग्रंथालय वाढत होते आणि याचेच एक रोपटे 18 फेब्रुवारी 2011 रोजी सांबरा येथे लावले गेले.

पुस्तक परिचय उपक्रम

वाचकांसाठी नवनवीन योजना आखाव्यात, याचा ध्यास याळगी, कुलकर्णी  आणि ओगले या त्रिमूर्तींना सतत सतावत असायचा आणि त्यातूनच वाचकांसाठी साप्ताहिक, मासिकांचा स्वतंत्र विभाग सुरू करावयाचा, ही कल्पना सुचली आणि 1 मे 2011 रोजी ती सुरू करण्यात आली. यानंतरचा उपक्रम म्हणजे 3 जुलै 2011 रोजी किरण ठाकुर व उमा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ‘पुस्तक परिचय’ या नव्या उपक्रमाला सुरुवात झाली आणि महिन्यातून दोन वेळा अशा कार्यक्रमास सुरुवात झाली.

लोकमान्य गंथालयाचा सुरुवातीपासूनचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे पुस्तक खरेदीकरीता ठराविक कालावधी करावयाचा नाही. या आठवडय़ात एखादे पुस्तक प्रकाशित झाले असेल तर ते दुसऱया आठवडय़ात आपल्या गंथालयात ते उपलब्ध असले पाहिजे. यामुळे गंथालयात नवनवीन प्रकाशित झालेली पुस्तके लगेच खरेदी केली जातात व त्याचे वाचकांसाठी प्रदर्शन भरवले जाते. जेणेकरुन वाचक त्याचा मुक्तपणे आस्वाद घेऊ शकतील.

लोकमान्य गंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला बळ मिळतच होते. यामध्ये कमतरता की काय म्हणून 27 फेब्रुवारी 2012 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि लोकमान्य ग्रंथालय पुन्हा समृद्ध झाले. याच दिवशी ग्रंथालयाला दोन वर्षे पूर्ण झाली आणि ग्रंथालय चांगल्याप्रकारे गुटगुटीत व गोंडस झाले होते.

2 मे 2012 रोजी गंथालयाने कामगार दिनानिमित्त शिवचरित्रांचे प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन कपिलेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध लेखकांनी लिहिलेली शिवचरित्रे वाचकांपर्यंत पोहचविणे हाच याचा हेतू होता.

11 जून 2012 रोजी ऍड. रमाकांत खलप व निर्मला खलप यांनी लोकमान्य गंथालयास भेट दिली. गंथालयाच्या वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध कथा लेखिका कमल देसाई यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य गंथालयात कमल देसाई स्मृतीदालनाचे डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि ग्रंथालयास पुन्हा नव्याने वैभव प्राप्त झाले.

गंथालयास दिवसेंदिवस प्रसिद्धी व भेट देणाऱयांच्या संख्येत वाढ होत होती. त्याच दरम्यान घटप्रभेचे प्रख्यात डॉ. घनश्याम वैद्य व त्यांच्या पत्नी स्वाती वैद्य यांनी भेट दिली. 2 ऑगस्ट 2012 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती असा दुहेरी कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला दिनेश केळुस्कर होते. दि. 5 नोव्हेंबर 2012 रोजी ग्रंथलेखन व पत्रकारिता यांचा वारसा लाभलेले अरुण टिकेकर यांच्याशी गप्पाटप्पाचा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन हजारहून अधिक वाचनालये आहेत. परंतु लोक येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हल्लीचे प्रोफेसर व मास्तर वाचत नाहीत. तेथे वाचकसुद्धा कमीच असणार. परंतु अवांतर वाचन करणारा वाचक नाही, असे मानण्याचे कारण नाही. या वाचकाला दिशा देण्याची गरज आहे.

यानंतर आठवी व दहावी विद्यार्थी विद्यार्थिनींना रोजनिशी लिहिण्याची सवय लागावी, या उद्देशाने अक्षर मानव पुणे व लोकमान्य ग्रंथालयाच्यावतीने मराठी रोजनिशी लेखन स्पर्धेचे आयोजन केले.

संगणक सुविधेने सज्ज

ग्रंथालयाने वाचकांची बौद्धिक भूक भागविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. वाचकांना बौद्धिक आनंद देतानाच त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने ग्रंथालयाचे संगणकीकरण केले. या संगणक सुविधेचे उद्घाटन किरण ठाकुर यांच्या हस्ते केले. या संगणकीकरणामुळे गंथालयाचा कामकाजात सुविधा प्राप्त झाली. व वाचकानाही त्याचा बराच उपयोग होऊ लागला. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेळगावमधील पहिले ग्रंथालय जे संगणक सुविधेने सज्ज होऊन मिरवू लागले.

23 डिसेंबर 2012 रोजी ग्रंथालयाने आणखी एक भरारी घेतली ती म्हणजे घरपोच पुस्तक योजनेसाठी मोटरसायकल खरेदी केली. दीड वर्षात घरपोच सभासदांची संख्या 150 वर पोहचली होती. सायकलवरुन इतक्मया सभासदांपर्यंत पोहचणे कठीण जाऊ लागले. त्यासाठी मोटारसायकल खरेदी करण्यात आली. लोकमान्य ग्रंथालयास पुष्पा भावे, अनिल अवचट, कुमार केतकर, संभाजी भगत, श्रीनिवास ठाणेदार, अनिल मेहता, अतुल पेठे अशा मान्यवरांच्या भेटी होत होत्या. आणि ग्रंथालय साहित्यिकांच्या पदस्पर्शाने पावन होत होते.

31 मार्च 2013 रोजी वा. पु. गिंडे यांच्या ‘आस्वाद : समीक्षा व अध्यापन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. राजन गवस यांच्या हस्ते झाले. रामनवमीनिमित्त ‘गीत रामायण’च्या ध्वनी चित्रफितीचे लोकमान्य ग्रंथालयाने सलग सहा दिवस सादरीकरण केले. या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहाच्या सहा दिवस पाय ठेवण्यास जागा नव्हती इतकी प्रचंड गर्दी. ध्वनी चित्रफितीद्वारे जेव्हा ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’ हे गीत सादर झाले, तेव्हा गंथालयातर्फे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. या गीताला श्रोत्यानीही ताल धरला.

यानंतर 11 जून 2013 रोजी साने गुरुजी स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विष्णुपंत कुलकर्णी उपस्थित होते. वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘रोप लागवड करा. वृक्ष संवर्धन करा.’ असे आवाहन सतत आणि सर्वत्र केले जाते. या आवाहनाला कृतीची जोड देत ग्रंथालयातर्फे संस्थेच्या परिसरात विठ्ठलराव याळगी, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, सुभाष चौगुले यांच्या हस्ते चाळीस रोपांची लागवड करण्यात आली. ग्रंथालयातर्फे जी. ए. कुलकर्णी व कमल देसाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘एक कप चहा’ हा चित्रपट दाखविण्यात आला. आणि या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्रंथालय कोणताही कार्यक्रम करु दे, तो उत्तम म्हणजे उत्तमच व्हायचा. वाचकांची व रसिकांची भरपूर दाद कायम मिळतच गेली. यानंतरचा सर्वात सुंदर कार्यक्रम म्हणजे ‘नक्षत्रांचे देणे’. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

इंदिरा संत कलामंच

दि. 3 सप्टेंबर 2013 रोजी गोवा वाचक सल्लागार समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथालय पाहून त्यांनी गौरवोद्गार काढले. अनायसे या कार्यक्रमाला मधूभाई लाभले. 2013 मध्ये ग्रंथालयाच्या वैभवात पुन्हा एकदा भर पडली. ती म्हणजे बेळगावचे वैभव असलेल्या इंदिरा संत यांच्या नावाने कलामंचाच्या उद्घाटनाने. ‘इंदिरा संत कलामंच’चे उद्घाटन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला किरण ठाकुर, आश्विनी घोंगडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला रसिक वाचकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

या कलामंचच्या उद्घाटनानंतर निरनिराळय़ा कार्यक्रमांची पर्वणीच सुरु झाली. 7 डिसेंबर 2013 रोजी दादा मडकईकर यांचा काव्यगायनाचा कार्यक्रम झाला. त्यांच्या कवितांतून कोकणचे सौंदर्य अनुभवायला मिळाले. रसिकांनी प्रचंड दाद दिली. दि. 14 डिसेंबर रोजी इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सहवास’ हा गीतांजली जोशी व डॉ. अमित त्रिभुवन यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. सहवासातून इंदिरा संत व
ना. मा. संतांचे सहजीवन उलगडले.

29 डिसेंबर 2013 रोजी इंदिरा संतांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘रंगबावरी’ हा कार्यक्रम रसिकांना खूप आवडला. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2014 रोजी लोकमान्य ग्रंथालय सदस्य सहस्रपूर्ती सोहळय़ानिमित्त ‘कविता फुलली अशी’ हा विष्णू सूर्या वाघ यांचा कार्यक्रम खूप छान झाला.

बालग्रंथालयाचे उद्घाटन

27 एप्रिल 2014 रोजी पॉप्युलर प्रकाशन व लोकमान्य गंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा संत जन्मशताब्दीनिमित्त ‘इंदिरा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला. 2014 मधील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे लोकमान्य ग्रंथालयातर्फे बालग्रंथालयाचे उद्घाटन. मुले पुस्तकांपर्यंत पोहचत नाहीत. यासाठी पुस्तके मुलांपर्यंत पोहोचावीत, हा उद्देश ठेवून विविध भागात म्हणजेच टिळकवाडी, वडगाव, शहापूर, गणेशपूर, सदाशिवनगर, सहय़ाद्रीनगर या ठिकाणी 1500 रुपयांची पेटी व 3500 रु.ची पुस्तके असे एकूण 5000 रु ची बालग्रंथपेटी दिली. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

दि. 11 मे 2014 रोजी कुसुमाग्रज प्रति÷ानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेशी संलग्न या योजनेंतर्गत बेळगावमधील विविध ठिकाणी लोकांकडे 100 पुस्तकांची पेटी ग्रंथालयातर्फे दिली.

दि. 11 जून 2014 रोजी सानेगुरुजी स्मृतिदिनानिमित्त ‘श्यामची आई’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाला रसिकांची तुडुंब गर्दी झाली. मात्र काही लोकांना परत जावे लागले. 27 जून 2014 मध्ये शाहु महाराज जयंतीनिमित्त शाहु महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन भरविले. या मागचा उद्देश असा होता की वेगवेगळय़ा लेखकांनी लिहिलेली चरित्र वाचली जावीत.

6 जुलै 2014 रोजी लोकमान्य गंथालयातर्फे अनुताई कित्तुर यांच्या ‘मागे वळून पाहताना’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला किरण ठाकुर, मंदाकिनी देसाई, शोभा नाईक, अशोक याळगी होते. 10 जुलै 2014 रोजी जी ए कुलकर्णी यांच्या 92व्या जयंतीनिमित्त तीन पुस्तकांचे प्रकाशन, नाटय़ाभिवाचन, ध्वनीचित्रफीत सादरीकरण या कार्यक्रमाला उमा कुलकर्णी, शशीकांत लावणीस, विलास साळुंखे, अमृत यार्दी ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. 10 जानेवारी 2015 रोजी प्रदीप लोखंडे, पुणे यांच्या रुरल रिलेशन्स संस्थेमार्फत खानापूर तालुक्मयातील तब्बल 64 मराठी माध्यम शाळांच्या मुख्याध्यापकांना दिग्गज लेखक, कवी, कथाकार यांच्या पुस्तकांची एक पेटी दिली. या कार्यक्रमाला प्रदीप लोखंडे,  किरण ठाकुर, परशुरामभाऊ नंदीहळ्ळी ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

लोकमान्य गंथसखा पुस्तक विक्री केंद्र

7 मे 2015 पासून सुभाष जाधव स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेला दत्तप्रसाद दाभोळकर लाभले. ‘विवेकानंदांची खरी ओळख’ या विषयावर तीन दिवस त्यांचे व्याख्यान झाले. लोकमान्य ग्रंथालयाचा आणखीन एक महत्वाचा उपक्रम म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु केलेले ‘लोकमान्य गंथसखा पुस्तक विक्री केंद्र’. या पुस्तक विक्री केंद्रामागचा उद्देश म्हणजे बेळगावातील वाचकांपासून कोणतेही नवे पुस्तक दूर राहू नये. ते तातडीने बेळगावात उपलब्ध व्हावे. तसेच ते वाचकांना खरेदीही करता यावे, या उद्देशातून हा उपक्रम!

लोकमान्य ग्रंथालयाच्या सर्वात अविस्मरणीय असा कार्यक्रम म्हणजे ‘आनंदवन प्रयोगवन’चा लोकार्पण सोहळा! 9 ऑगस्ट 2015 च्या कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, कौस्तुभ आमटे, अनिल अवचट व समकालीन प्रकाशनाची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती.

बुक लव्हर्स क्लब

ग्रंथालय फक्त पुस्तकांची देवाणघेवाण करणारे केंद्र न होता, ते एक सांस्कृतिक चळवळीचे व वाचनाचे केंद्र ठरावे, हा संस्थापक किरण ठाकुर यांचा हेतू होता. आणि याच संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2015 रोजी ‘बुक लव्हर्स’ची स्थापना झाली. गंथालयात येणाऱया मंडळीनी अधिक नियमितपणे भेटावे अशी कल्पना सुधीर जोगळेकर यांनी मांडली व पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांनी उचलून धरली. आणि अशोक याळगी यांनी ‘बुक लव्हर्स क्लब’ हे नाव सुचविले आणि ते सर्वमान्य झाले. क्लबचे अध्यक्ष म्हणून सुधीर जोगळेकर व सचिव म्हणून अशोक ओऊळकर यांची निवड करण्यात आली.

हळुहळु क्लबमध्ये सदस्य संख्या वाढू लागली व आठवडय़ातून एकदा लोकमान्य गंथालयात दर रविवारी बैठक होऊ लागली. आठवडय़ातून एकदा भेंटणे हेदेखील खूप कमी होते. त्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा भेटायचे ठरले व गुरुवार व रविवार अशी दोन दिवस बैठक सुरु झाली. आणि फेब्रुवारी 2020 मध्ये बुलक खूपच लोकप्रिय झाले आहे. दिवसागणीक नवनवीन सदस्य आपले विचार मांडण्यासाठी बुलकमध्ये सक्रीय होत आहेत. बुलकमुळे निरनिराळय़ा विषयांवर चर्चा होऊ लागल्या आहेत.

30 जानेवारी 2016 रोजी ग्रंथालयात ‘महात्मा गांधीजी समग्र विचार दर्शन’ या नव्या विभागाचे उद्घाटन भारती मराठे यांच्या हस्ते झाले. वाचकांसाठी गांधीजी समग्र विचार दर्शन उपलब्ध करुन दिले. शेक्सपिअर यांच्या 400 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गंथालयाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

याच उपक्रमातून चित्रलोक या नवीन उपक्रमांची निर्मिती झाली. चित्रलोकद्वारे मराठी, इंग्रजी व इतर भाषेतील पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखविले जातात. या उपक्रमाला देखील रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. महिन्यातून 4 चित्रपट दाखविले जातात.
12 ऑगस्ट 2017 रोजी गंथालयातर्फे गंथालय दिन साजरा करण्यात आला.

ग्रंथपालांचा सत्कार

बेळगावमधील सार्वजनिक वाचनालय, सरस्वती वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ येथील ग्रंथपालांचा गंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. ग्रंथालयातर्फे वसंत लिमये, विजया वाड, भारत सासणे यांची विविध विषयांवर व्याख्याने ठेवण्यात आली. दि. 21 डिसेंबर 2017 रोजी टाटा हाऊसिंग व टाटा फायनान्शिएल सर्व्हिसेस या कंपन्याच्या निर्देशक व साहित्यप्रेमी अनुराधा एकनाथ ठाकुर यांनी लोकमान्य ग्रंथालय व बुलकला भेट दिली.

दि. 25 फेब्रुवारी 2018 रोजी नाटय़कर्मी सई परांजपे यांची प्रकट मुलाखत मीना पानसर यांनी घेतली. दोन तास चाललेल्या या मुलाखतीने रसिकांना खिळवून ठेवले होते. दि. 24 नोव्हेंबर 2018 रोजी अजंठा फिल्म व लोकमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जर्मन चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. यालाही रसिक श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बुक लव्हर्स क्लबतर्फे हेरीटेज वॉक कार्यक्रम आयोजित केला होता. स्वाती जोग यांनी यावेळी महत्वपूर्ण माहिती दिली. अशाप्रकारे ग्रंथालय बुलकतर्फे महिन्याला 8 कार्यक्रम, चित्रलोकचे 4 व गंथालयाचे वेगळे 2, 4 कार्यक्रम असे जवळ जवळ वर्षभरात एकुण 170 च्यावर कार्यक्रम ग्रंथालय करत असते. ही एक खूप स्वाभिमानाने सांगाविशी वाटते कारण बेळगावातच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रिय संस्था म्हणजे लोकमान्य ग्रंथालय असावी!

किरण ठाकुर यांनी 27 फेब्रुवारी 2010 रोजी लावलेले हे रोपटे अशोक याळगी, कै. अविनाश ओगले, कै. विष्णुपंत कुलकर्णी यांनी रोपटय़ाचे एका वटवृक्षात रुपांतर केले आहे. आज 10 वर्षातील ग्रंथालयाच्या वाटचालीकडे पाहताना खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो.

गंथालयाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत ग्रंथपाल रंजना कारेकर, प्रशांत कुटे, गुरुदास सुवारे यांचा सिंहाचा वाटा आहे.

रंजना कारेकर (ग्रंथपाल)

लोकमान्य गंथालय, बेळगाव

Related posts: