|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा धोका नाही

वृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा धोका नाही 

 

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास नको

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. वर्तमानपत्रांच्या वितरणातूनही कोरोना पसरू शकतो, असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, असंख्य सर्वसामान्य वाचकांच्या मनातही शंका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तथापि, वृत्तपत्राच्या वितरणातून कोरोना पसरण्याचा धोका मुळीच नाही, असे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांनीही दिली असून वाचकांनी यासंदर्भात कोणतीही साशंकता बाळगण्याचे कारण नाही.

वृत्तपत्रांची छपाई स्वयंचलित यंत्राद्वारे कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय केली जाते. हातमोजे आणि फेस मास्क घातलेल्या हँडलरद्वारे वर्तमानपत्रांचे छपाई झालेले गठ्ठा वितरणासाठी वाहनांमध्ये ठेवले जातात. वृत्तपत्र वाचकांच्याकडे पाठवण्यापूर्वी डेपोमध्ये आरोग्यविषयक नियमावलीचे (हायजीन प्रोटोकॉल) पालन केले जाते. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रसार होणे अशक्य असते. घरोघरी वृत्तपत्रांसारख्या वस्तूंचे वितरण होतानाही कोणत्याही विषाणूंमुळे वृत्तपत्र दूषित होण्याचा धोका नगण्य असतो. त्यामुळे वाचकांच्या हाती पडलेले वृत्तपत्र निर्धोक असते असे जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.

त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन वितरीत केलेल्या वृत्तपत्रांद्वारेही संसर्ग होण्याचा धोका नाही, असे अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे. भारतीय वृत्तपत्रे कोविड-19 बाबत अधिक माहितीसह अधिकृत बातमी आणि साथीच्या आजाराबद्दलच्या माहितीसाठी विश्वासार्ह स्त्रोत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडता तसेच अविश्वसनीय आणि बनावट बातम्यांवर विश्वास न ठेवता कोरोना विषाणूच्या साथीमध्येही वाचकांनी वृत्तपत्रातील माहितीचा पुरेपूर आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related posts: