|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुसऱया दिवशीही जनता कर्फ्यू यशस्वी

दुसऱया दिवशीही जनता कर्फ्यू यशस्वी 

 पणजीसह राज्यात सर्वत्र शुकशुकाट

प्रतिनिधी/ पणजी

जनता कर्फ्यूमध्ये आणखी तीन दिवसांची वाढ केल्यानंतर राजधानी पणजीसह राज्यातील सर्वच बाजारपेठा तसेच रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी पहाटेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत दुकाने उघडून दुकानदारांनी ग्राहकांना दिलासा दिला. रविवारसारखाच सोमवारीही जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचे दिसून आले.

राजधानी पणजीत सोमवारी सकाळपासून जनतेच्या काही हालचाली दिसून आल्या. सरकारी व निमसरकारी कर्मचाऱयांसह राज्यातील सर्वांनाच सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारीवर्ग विविध खासगी आस्थापनांमध्ये काम करण्यासाठी सकाळी तयारी करून जेव्हा बसस्थानके वा बसथांब्यांवर आले त्यावेळी कदंबसह एकही खासगी बस आली नसल्याने वाट पाहून ही मंडळी घरी परतली.

राज्यातील काही दुकानदारांनी सकाळी दुकाने उघडली. परंतु फारसे ग्राहक नाहीत हे पाहून दुकाने बंद केली. काही ठिकाणी पोलीस येऊन त्यांनी राज्यातील विविध शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने बंद केली. पणजी मार्केट परिसरात पहाटेपासून पोलीस उभे होते. त्यामुळे भाजी व भुसारी तथा फळे, फुले यांची विक्री होत असलेले मार्केट बंदच राहिले. महापौर उदय मडकईकर यांनी पणजी मार्केट पहाटे 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केला होता. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी तो रात्री उशिरा मागे घेतला.

मडकईकर यांनी आपला आदेश फिरवला. परंतु तो अनेकांपर्यंत पोहोचला नसल्याने काही भाजी व फळ विक्रेते पहाटे पणजी मार्केटपर्यंत पोहोचले व मासळी विक्रेतेही पोहोचले. भाजी विक्रेत्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. मात्र मार्केटच्या मागील बाजूला काही नुस्तेकारांनी मासळीची विक्री केली. मासळी संपताच त्यांनी 8 वाजताच मार्केट बंद केले.

थोडीशी वाहतूक, बाकी सामसूम

राजधानी पणजीत सकाळी थोडीफार दुचाकी व काही चारचाकी वाहने फिरत होती. सकाळी 9 पर्यंत अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पुलावरून शहरात जाऊ लागली. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर वाहनांचे प्रमाण थंडावले व कालच्या रविवारसारखाच जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळला. पणजीत एकही हॉटेल उघडे नव्हते. सर्वच्या सर्व दुकाने बंद होती. केवळ औषधालये व काही डॉक्टर्सचे दवाखाने चालू होते. राजधानी पणजीत भरदिवस कुठेही सार्वजनिक ठिकाणी चहाच नव्हे तर पाण्याची बाटली मिळणेही दुरापास्त झाले होते. एवढा कडकडीत कर्फ्यू पाळण्यात आला.

Related posts: