|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात विलगीकरण कक्षातून सहाजणांना घरी पाठवले

सिंधुदुर्गात विलगीकरण कक्षातून सहाजणांना घरी पाठवले 

कोरोनाचा एकही रुग्ण नाही

6041 रुग्णांची तपासणी

197 व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’

घरोघरी होणार सर्व्हे

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या नऊपैकी सहा रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर आणखी एक रुग्ण दाखल झाला असून सद्यस्थितीत चार रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 6041 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. 197 व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोना विषाणूचा एकही रुग्ण किंवा संशयित रुग्ण नाही. मात्र किरकोळ लक्षणे असणाऱया एकूण नऊ रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन रुग्ण परदेशातून आल्याने थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. परंतु, दोन्ही रुग्णांचे नमुने कोरोना निगेटीव्ह आले. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा झालेल्या नऊपैकी सहा रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले. मंगळवारी नव्याने एक रुग्ण दाखल झाला आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षामध्ये एकूण चार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसत नाहीत.

आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स करणार घरोघरी सर्व्हे

आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती तसेच त्यांच्या प्रवासाची माहिती घेतली जाणार आहे. कोणाला खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आहे का, बाहेर जिल्हय़ातून आलेल्या व्यक्ती याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. तर नगर पालिका क्षेत्रामध्ये नगर पालिका प्रशासनातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

197 व्यक्ती क्वारंटाईनमध्ये

 आरोग्य यंत्रणेमार्फत एकूण 5016 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सर्व पोलीस तपासणी नाक्मयांवर 1025 व्यक्तींची तपासणी केली आहे. जिल्हय़ात एकूण 197 व्यक्ती क्वारंटाईन असून विलगीकरण कक्षामध्ये चार रुग्णांना दाखल केले आहे. विलगीकरण कक्षामध्ये दोडामार्ग येथील एक रुग्ण नव्याने भरती करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

परदेश प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Related posts: