ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज 14 ठिकाणी छापेमारी केली. जम्मूमध्ये लष्कर-ए-मुस्तफाचा कमांडर हिदायतुल्लाह मलिकची अटक आणि 5 किलो आयईडी जप्त केल्याच्या प्रकरणात NIA कडून ही कारवाई केली जात आहे. शोपियां, अनंतनाग, बनिहाल, सुंजवान आणि जम्मूसह 14 ठिकाणी NIA ची छापेमारी सुरू आहे.
6 फेब्रुवारी 2019 मध्ये दहशतवादी हिदायतुल्लाह मलिकला गंगायाल येथे अटक करण्यात आली होती. मलिकच्या अटकेनंतर आणि जम्मूमधील दहशतवादी कटाच्या खुलाशानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आला.
बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या ‘लष्कर-ए-मुस्तफा’ या प्रॉक्सी संघटनेने जम्मूमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता. हिदायतुल्लाहच्या अटकेनंतर त्याच्या ताब्यातून एक हँड ग्रेनेड, तीन मॅगझीन आणि 28 गोळ्या जप्त करण्यात आल्या. हिदायतुल्लाहने 2018 आणि 2019 मध्ये जम्मू आणि दिल्लीत अनेक महत्त्वाच्या लष्करी आस्थापनांवर दहशतवादी हल्ल्यांसाठी रेकी केली होती.