पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुण्यात छापा टाकून इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली. एनआयएच्या पथकाने पुणे आणि मध्यप्रदेशातील सिवोनी जिल्हय़ात छापा टाकून संशयितांकडे चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतून काश्मिरी दाम्पत्य जहाँजेब वाणी आणि त्याची पत्नी बशीर बेग यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) अटक केली होती. वाणी दाम्पत्य इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत दहशतवादी गटाशी संबंधित असल्याची माहिती तपासात मिळाली होती. या प्रकरणात तिहार कारागृहात असलेला आरोपी अब्दुल बशीथ संशयित असल्याचे उघडकीस आल्यानंतर एनआयएने मध्यप्रदेशातील सिवोनी आणि पुण्यात छापा टाकला. तसेच एनआयएने पुण्यातील तलहा खान आणि मध्यप्रदेशातील सिवोनी गावातील अक्रम खान याच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.
एनआयएकडून शोधमोहीम राबवून साहित्य जप्त
मध्यप्रदेशात तरुणांना एकत्र आणून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करुन घेतल्या जाणार होत्या. एनआयएच्या पथकाने शोधमोहीम राबवून काही साहित्य जप्त केले. अफगाणिस्तानसह देशात सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी गटांचे काम सोशल मीडियावर प्रसारित करुन तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम केले जात असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, एनआयएच्या पथकाने नोव्हेंबर 2022 मध्येही कारवाई केली होती. त्याआधारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.