पुरावे असल्यास चौकशी समितीकडे देण्याची गृहमंत्र्यांची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 6 सदस्यीय समिती स्थापन केल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. या समितीत दोन निवृत्त न्यायाधीशही आहेत. ज्यांच्याकडे या प्रकरणी काही पुरावे असतील त्यांनी ते पुरावे या समितीला द्यावेत. काही चूक झाली तर कुणालाही सोडले जाणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य शहा यांनी शनिवारी केले.
देशातील न्यायालयांवर सर्वांचा विश्वास असायला हवा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. दिल्लीतील एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीसह सेबीही या प्रकरणाची चौकशी करत आहे. अशा परिस्थितीत कोणीही बिनबुडाचे आरोप करू नयेत. कोणाकडेही सबळ पुरावे असल्यास त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी समितीकडून देऊन सहकार्य करावे, अशी सूचना शहा यांनी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरही शहा यांनी हल्लाबोल केला.