खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी समिती बैठकीत अभियंत्याची माहिती
प्रतिनिधी / खानापूर
नगरपंचायतीच्या स्थायी समितीची बैठक सभागृहात बुधवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर होते. नगराध्यक्ष नारायण मयेकरसह इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी कर्मचारी प्रेमानंद नाईक यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी आर. के. वठार यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवकानी शहरातील बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना नगरपंचायतीचे अभियंते तिरुपती राठोड यांनी सरकारी इमारतींना बांधकाम परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
सर्वांना एकच कर आकारावा
शहरात सर्वसामान्य लोकांना नगरपंचायतीकडून बांधकाम परवानगीसाठी धारेवर धरले जाते. तसेच परवानगीसाठी बेसुमार कर आकारला जातो. याबाबत नगरसेवक विनायक पाटील यांनी प्रश्न विचारला व बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना हेलपाटे मारुन भरमसाट बांधकाम फी आकारला जाती. यासाठी सर्वांना एकच कर आकारला जावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सर्वांना बांधकाम परवानगीशिवाय बांधकाम करण्यास देऊ नये, यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी, अशी मागणी केली.
नोटिसा-अहवाल मराठीतून देण्यात यावा
यावेळी नगराध्यक्ष नारायण मयेकर म्हणाले, बैठकीचा अहवाल व नोटीस यापूर्वी मराठीत देण्यात येत होता. त्या आता कन्नडमध्ये देंण्यात येत आहे. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुढील नोटिसा व अहवाल मराठीतून देण्यात यावा, अशी सूचना केली. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नगरसेवक विनायक कलाल, राजश्री तोपिनकट्टी, रफिक वारीमणी, आप्पय्या कोडोळी, जया भुतकी, सायरा सनदी यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.