नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्पाईसजेट या खासगी प्रवासी विमान कंपनीच्या विमानांना गेल्या आठ दिवसांमध्ये 18 छोटय़ा मोठय़ा दुर्घटनांना सामोरे जावे लागले आहे. दोन वेळा विमानांचे क्रॅश लँडिंग करावे लागले आहे. तर काहीवेळा विमानांमधील बिघाडांमुळे उड्डाणांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. या घटनांमुळे डीजीसीए या नियंत्रक संस्थेने या कंपनीला नोटीस पाठविली असून प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचे स्पष्टपणे बजावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
5 जुलैला स्पाईसजेटचे एक प्रवासी विमान (बोईंग 737), जे चीनच्या चोंगकिंग येथे जाणार होते, ते विमान कोलकाता येथे परत आणण्यात आले. विमानाचे हवामान दर्शक रडार निकामी झाल्याचे उड्डाणानंतर काही काळातच चालकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून विमान कोलकाता विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका संभाव्य दुर्घटनेतून सुटका झाली असली तरी कंपनीची ढिलाईही यातून समोर आली होती. विशेषत।़ या घटनेची गंभीर दखल डीजीसीएने घेतली आहे. ही घटना गेल्या मंगळवारी घडली होती. त्याच दिवशी दिल्लीहून दुबईला जाणाऱया याच कंपनीच्या विमानात बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने ते कराची विमानतळावर उतरविण्यात आले होते. आणखी एक विमान मुंबईच्या विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले होते.
स्पाईसजेट ही वाजवी दरातील विमानसेवा म्हणून ओळखली जाते. मात्र, कंपनीचा कमी दरांचा परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर होता कामा नये, असा संदेश डीजीसीएने (डायरेक्टर जनलर ऑफ सिव्हील एव्हिएशन) दिला आहे.