तिन्ही सैन्यदले सतर्क : पुतीन यांच्या उपस्थितीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण
मॉस्को / वृत्तसंस्था
युपेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान बुधवारी रशियाने अण्वस्त्र कवायती सुरू केल्या. यादरम्यान बॅलेस्टिक क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. यासंबंधीचे फुटेज सरकारी टीव्हीने प्रसिद्ध केले असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका नियंत्रण कक्षातून संपूर्ण सराव पाहिल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या नेतृत्वाखाली बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्र प्रक्षेपण केल्याच्या वृत्ताला रशियन सरकारनेही निवेदन जारी करत दुजोरा दिला आहे. प्रक्षेपित केलेल्या सर्व क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्य गाठल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एकीकडे रशियन सैन्य युपेनवर अण्वस्त्र हल्ला करू शकते, असा दावा अमेरिका करत आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि नाटो आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाच्या पूर्व भागात बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेण्यात आल्या. तांत्रिकदृष्टय़ा या संचलनाला ‘स्ट्रटेजिक डिटरन्स फोर्स’ किंवा प्रतिआक्रमणाची सज्जता असे म्हटले जाते. चाचण्या घेतलेला भाग हा आर्क्टिक समुद्राचा प्रदेश आहे. या सरावात रशियाच्या नवीन आणि हायटेक टीयू-95 विमानांचाही वापर करण्यात आला. रशियाकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात पोहोचू शकतात. याशिवाय त्यांच्याकडे अणुहल्ला करू शकणाऱया पाणबुडय़ाही आहेत. तसेच रशिया लढाऊ विमानांनीही सज्ज आहे.
पेंटागॉनला दिली पूर्वकल्पना
रशियाने अमेरिकेला आण्विक कवायतीची माहिती दिली होती. त्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रेही डागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पेंटागॉननेही याला दुजोरा दिला आहे. रशियाने आम्हाला माहिती दिली होती. हा त्यांचा सर्वसाधारण सराव असल्याचे पेंटागॉनचे प्रवक्ते पॅट्रिक रायडर यांनी सांगितले. सद्यस्थितीत रशिया शस्त्रास्त्र नियंत्रणाशी संबंधित अटी आणि पारदर्शकतेचे आश्वासन पूर्ण करत असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. रशियाने पेंटागॉनसोबतच अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांना चाचण्यांसंबंधी माहिती दिल्याचीही चर्चा आहे.