नवी दिल्ली / वृत्तसंस्था
साधारणतः 15 वर्षांपूर्वी दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीत पोलीस इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांची हत्या केलेला गुन्हेगार आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या शहजाद अहमद याचा दिल्लीतील एम्सच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या चकमकीत अन्य पोलीस अधिकाऱयांवर हल्ला करण्याच्या आरोपातही तो दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्याच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते. उपचार कालावधीत त्याचा आजारीपणाने मृत्यू झाला.
13 सप्टेंबर 2008 या दिवशी दिल्लीतील करोलबाग, कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलाश येथे साखळी बाँबस्फोट घडवून आणण्यात आले होते. त्या स्फोटांमध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 133 जण जखमी झाले होते. हे स्फोट इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने केले आहेत, असे नंतर तपासात निष्पन्न झाले होते. हे स्फोट करणारे दहशतवादी दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये दडलेले आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा आणि अन्य अधिकाऱयांनी बाटला हाऊसवर छापा टाकला होता. त्यावेळी शहजाद अहमद याने शर्मा यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या केली होती. नंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. त्याचा आता मृत्यू झाला आहे. त्या स्फोटानंतर काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अहमद याला उघडपणे सहानुभूती दर्शविल्याने आणि तो निर्दोष असल्याची भावना व्यक्त केल्याने टीका झाली होती.