पुणे : साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर असून, महाराष्ट्र देशाच्या पातळीवर अव्वलस्थानी आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात वैश्विक पातळीवरील आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन या साखर उद्योग क्षेत्रातील अग्रणी संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय 67 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, साखर निर्मिती उद्योगामध्ये संशोधन आणि तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, त्याचा उपयोग या उद्योग प्रक्रीयेतील प्रत्येक छोट्या घटकाला होणे आवश्यक आहे. साखर उद्योगाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. अगदी मानसूनपासून दुष्काळ, पूर, कीड, भारनियमन, हमीभाव अशा प्रत्येक टप्प्यावर येत असलेल्या संकटांचा विचार करून तरूण पिढीने यावर उपयुक्त असे संशोधन करावे. या क्षेत्रातील संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज असून ज्या प्रकारच्या संशोधनामुळे कोणत्याच पातळीवर नुकसान होणार नसेल अशा संशोधनाला मान्यता देणे गरजेचे आहे. कृषी उत्पादनात साखर निर्यातीत महत्त्वाची कामगिरी करणाऱया आपल्या देशाने पर्यावरणाच्या दृष्टीने देखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
अधिक वाचा : शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी, ठाकरेंचा अर्ज फेटाळला
प्रदूषणाचा वाढता विळखा लक्षात घेऊन इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना देखील अधिक चालना दिली पाहिजे. डीएसटीए अर्थात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ही साखर उद्योग क्षेत्रातील एक अग्रणी संस्था असून प्रख्यात उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी दूरदृष्टी ठेवून 1936 मध्ये या संस्थेची स्थापना केली. मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील साखर उद्योगाच्या तांत्रिक गरजांची पूर्तता करणे आणि या उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन केली असून साखर निर्मिती उद्योगांना आजही अव्याहतपणे डीएसटीए आपली सेवा देत आहे. डीएसटीएची सभासद संख्या 2200 हून अधिक असून यामध्ये साखर उद्योगाशी संबंधित तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे, ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. साखर उद्योगाच्या विविध पातळय़ांवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 4-5 संस्था देशात असून त्यामध्ये डीएसटीएचे स्थान वरचे आहे.