घरबसल्या बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
बेळगाव : चार महिने होत आले तरी हेस्कॉमची ऑनलाईन बिलभरणा सेवा ठप्पच आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम, अॅमेझॉन पे यासारख्या अॅप्लिकेशनमधून या महिन्यातही बिल भरता येणार नाही. त्यामुळे वीजग्राहकांना जवळच्या बेळगाव वन किंवा हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रावर जाऊनच बिल भरावे लागणार आहे. राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले असून किमान या सरकारने तरी नागरिकांना घरबसल्या विजेचे बिल भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वीजग्राहकांमधून होत आहे.
ग्राहकांना घरबसल्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून विद्युत बिल भरता यावे, यासाठी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हेस्कॉमने सर्वप्रथम पेटीएम व त्यानंतर गुगल पे, फोन पे यासारख्या मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्याची संधी दिली. मागील पाच ते सहा वर्षांपासून ग्राहक घरबसल्या बिल भरत आहे. कोरोना काळात या सुविधेचा मोठाच फायदा ग्राहकांना झाला होता. यामुळे हेस्कॉम कार्यालयात होणारी गर्दी तसेच पेपरचा वापर कमी झाला होता. कर्मचाऱ्यांचे कामही कमी झाल्याने ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरत होती. 18 मार्च 2023 पासून मोबाईल अॅप्लिकेशनमधून बिल भरण्याची सुविधा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. युपीआय पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँकेने आपली सेवा सुरळीत ठेवण्यासाठी वाढीव दराची मागणी केली. ही रक्कम हेस्कॉमला परवडणारी नसल्याने इतर सर्व्हिस प्रोव्हायडर शोधला जात असल्याची माहिती हेस्कॉममधून उपलब्ध झाली.
वेळेत बिल भरण्यासाठी नागरिकांची तारेवरची कसरत
चार महिने होत आले तरी अद्याप ही सुविधा ठप्प आहे. त्यामुळे विद्युत ग्राहकांना दिवसभराच्या कामकाजातून वेळ काढत बिल भरणा केंद्रांवर गर्दी करावी लागत आहे. एकीकडे सर्व सरकारी कार्यालये ऑनलाईन होत असताना दुसरीकडे मात्र ऑनलाईन असलेली सेवा चार महिन्यांपासून बंद ठेवल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. वेळेत बिल न भरल्यास हेस्कॉमकडून कारवाई केली जाते. त्यामुळे वेळेत बिल भरण्यासाठी नागरिकांची तारेवरची कसरत सुरू आहे.