अवधीमध्ये वाढ करण्याची मागणी : 1 जूनपासून दोन टक्के दंड आकारला जाणार
बेळगाव : विनादंड कर भरण्यासाठी केवळ आठ दिवसांचा अवधी बेळगावच्या जनतेला मिळणार आहे. त्यानंतर दोन टक्के दंडासह घरपट्टी व इतर कर भरावा लागणार आहे. या वर्षी ऑनलाईन समस्येमुळे सवलतीचा कर भरणे अशक्य झाले. त्यानंतर जितका कर आला आहे तितका भरण्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये जनतेने प्रयत्न केले. त्यासाठी केवळ आठ दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी जनतेची धावपळ सुरू आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाला एप्रिलपासून प्रारंभ होतो. एप्रिल महिन्यात जर घरपट्टी व इतर कर भरल्यास पाच टक्के सवलत दिली जाते. मात्र यावेळी इच्छा असूनही विविध समस्यांनी बेळगावच्या जनतेला कर भरणे अशक्य झाले आहे. मे महिन्यामध्ये ही सवलत देण्यात आली नाही. केवळ कर भरावा लागत आहे. त्यासाठी आता 8 दिवसांचा अवधी असल्याने या आठ दिवसांत कर भरला नाही तर दोन टक्के दंड भरून पुढील महिन्यात कर भरावा लागणार आहे. वास्तविक, एप्रिल महिन्यामध्ये ऑनलाईन समस्या तसेच घरपट्टीचे चलन मिळाले नसल्याने अनेकांना कर भरणे अशक्य झाले आहे. त्यासाठी मुदतवाढ करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मनपानेही याबाबत बेंगळूरला प्रस्ताव पाठविला. मात्र त्या प्रस्तावाला अजूनही उत्तर आले नाही. त्यामुळे आता विना सवलत बेळगावच्या जनतेला कर भरावा लागत आहे. त्यासाठीही आता केवळ आठ दिवसांचा अवधी उरला असून त्यानंतर 2 टक्के दंडासह कर भरावा लागणार आहे. तेव्हा सरकारने याचा विचार करून विनादंड तरी कर भरण्यास मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बेंगळूरकडून अद्याप कोणताही आदेश आला नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. 1 जूनपासून दोन टक्के दंड आकारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.