मराठी भाषेत परिपत्रके मिळविण्यासाठी तालुक्यातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार : आंदोलनासंदर्भात गावोगावी जनजागृती
वार्ताहर /किणये
म. ए. समितीतर्फे सोमवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून मराठीतून परिपत्रके द्या, अशी मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनासंदर्भात तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून जनजागृती करण्यात आली असून तालुक्मयातील नागरिक या आंदोलनाला मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. तालुक्यात सर्वत्र एकच नारा आहे… चलो ठिय्या आंदोलन.
सीमाभागातील नागरिकांना मराठीतून परिपत्रके मिळावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. मात्र, येथील नागरिकांना अजूनही न्याय मिळत नाही. म. ए. समितीच्या माध्यमातून पाच-सहा महिन्यांपासून यासाठी जोरदार मोर्चा, आंदोलने सुरू आहेत.
गाव पातळीवर बैठका घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीलाही निवेदने देण्यात येऊ लागली आहेत. प्रशासनाकडून जोपर्यंत मराठीतून परिपत्रके मिळत नाहीत, तोपर्यंत ही लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीच्या नेतेमंडळींनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला शहरासह तालुक्मयातून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
तालुका म. ए. समितीच्या नेतेमंडळींनी गेल्या आठ दिवसांपासून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये बैठक घेऊन आंदोलनाबाबत जनजागृती केली आहे. तसेच आपली मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याचे आवाहनही केले आहे. गावागावांमधून आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार समितीच्या कार्यकर्त्यांनी व तरुणांनी घेतला आहे. त्यामुळे सोमवारच्या मोर्चाला तालुक्मयातील मोठय़ा संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर होणार आहेत.
शनिवारी सायंकाळी तालुक्मयाच्या पूर्व भागात आंदोलनासंदर्भात जागृती करण्यात आली. यावेळी शिवाजी सुंठकर, सुनील अष्टेकर, मधू मोदगेकर, कृष्णा शेरेकर आदींसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर कंग्राळी खुर्द परिसरातही आंदोलनासंदर्भात परिपत्रके वाटून जागृती केली. यावेळी भैय्या पाटील, निंगोजी पाटील, कल्लाप्पा पाटील, मनू पाटील आदी उपस्थित होते.
रविवारी दिवसभर तालुक्मयाच्या पश्चिम भागात माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली गावागावांमध्ये फिरून आंदोलनाची माहिती देण्यात आली. मराठीतून परिपत्रके मिळणे हा आमचा हक्क असून या आंदोलनात सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित व्हावे, असे आवाहन सुंठकर यांनी केले. थेट शेतशिवारात जाऊनही शेतकऱयांना आंदोलनात सहभागी होण्याचे सांगितले.
बेळगुंदी, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, कर्ले, रणकुंडये आदी भागात जागृती करण्यात आली. यावेळी किसन सुंठकर, भाऊ पाटील, नारायण पाटील आदींसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खनापुरातून मोठय़ा संख्येने सहभागी व्हा
खानापूर : मध्यवर्ती समितीने मराठीत कागदपत्रे मिळावित यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सोमवारी करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर म. ए. समितीने पाठिंबा जाहीर केला असून तालुक्यातून मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दिगंबर पाटील यांनी केले आहे. तालुक्यातून समिती कार्यकर्त्यानी सहभागी होण्याचा संकल्प केला असून याबाबत तालुक्यात पत्रके वाटून जागृती करण्यात आली आहे.
ठिय्या आंदोलनाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार
शहापूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
मराठी भषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु हा हक्क डावलण्याचा प्रयत्न राज्य सरकारबरोबर जिल्हा प्रशासनदेखील करीत आहे. त्यामुळे या विरोधात सोमवार दि. 8 रोजी ठिय्या आंदोलन केले जाणार असून या आंदोलनाला शहापूर विभागातून कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील, असा निर्धार शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आला.
गंगापुरी मठ येथे झालेल्या बैठकीला विभागातील माजी नगरसेवक म. ए. समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. गल्लीतील माजी पंच राजाराम मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मराठी कागदपत्रांसोबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबद्दल माहिती देण्यात आली.
या बैठकीला मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, नगरसेवक रवी साळुंखे, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, महादेव पाटील, गजानन शहापूरकर, अभिजित मजुकर, रणजित हावळाण्णाचे, राजकुमार बोकडे यासह मराठी भाषिक उपस्थित होते.
महिला आघाडीचा पाठिंबा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. मराठी भाषेतून परिपत्रके मिळणे हा मराठी भाषिकांचा हक्क असून यासाठी मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहून आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केले आहे.